IND vs NZ : सर्फराज खानचा शतकी तडाखा, न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचं कमबॅक
Sarfaraz Khan Century : मुंबईकर सर्फराज खानने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी विराट कोहली आणि ऋषभ पंतसह भागीदारी केली. या दरम्यान त्याने पहिलंवहिलं कसोटी शतक झळकावलं.

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात टीम इंडिया 46 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर न्यूझीलंडने 402 धावा करत 356 ची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया या सामन्यात कमबॅक करु शकेल, असं कदाचित कुणाला वाटलं असेल. मात्र टीम इंडियाने ते करुन दाखवलंय. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीनंतर मुंबईकर सर्फराज खान याने निर्णायक क्षणी चौथ्या दिवशी ऋषभ पंत याच्या साथीने खणखणीत आणि पहिलवहिलं शतक ठोकलंय. सर्फराजने या शतकासह टीम इंडियाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. तसेच सर्फराजच्या या शतकामुळे न्यूझींलडला बॅकफुटवर ढकलायला सुरुवात केली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
सर्फराजचा शतकी धमाका
सर्फराजने बगंळुरु कसोटीत 109 चेंडूंच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. सर्फराजने 13 चौकार 3 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. सर्फराजने या शतकी खेळी दरम्यान चौथ्या दिवशी ऋषभ पंतसोबत अप्रतिम सुरुवात केली. तर त्याआधी तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत अप्रतिम भागीदारी केली.
ऋषभ पंतसह शतकी भागीदारी
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी शेवटच्या बॉलवर विराट कोहलीच्या रुपात तिसरी विकेट गमावली आणि खेळ संपला. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या ही 3 बाद 231 अशी होती. त्यानंतरही टीम इंडिया 125 धावांनी पिछाडीवर होती. चौथ्या दिवशी नाबाद परतलेल्या सर्फराज खानसह ऋषभ पंत मैदानात आला. टीम इंडियाच्या या युवा जोडीने धमाका केला. या दोघांनी फटकेबाजी केली. सर्फराजच्या शतकानंतर ऋषभनेही अर्धशतक झळकावलं. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आणि तिथेच लंचब्रेक घेतला गेला. तोवर टीम इंडियाने 3 बाद 344 धावा केल्यात. पंत आणि सर्फराज या दोघांमध्ये 113 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. सर्फराज 125 तर पंत 53 धावांवर नाबाद आहेत. तर टीम इंडिया अद्याप 12 धावांनी मागे आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरं सत्र हे निर्णायक ठरणार आहे.
सर्फराजचा शतकी जल्लोष
A moment Sarfaraz Khan will remember forever! ☺️
He is jubilant, Rishabh Pant applauds & the dressing room on its feet! 👏 👏
Live ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pwt12jHfND
— BCCI (@BCCI) October 19, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.
