IND vs NZ : इशानचा शतकी तडाखा, सूर्याची तोडफोड खेळी,न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर, भारत किती रन्सने जिंकणार?
India vs New Zealand 5th T20i : भारताच्या 4 फलंदाजांनी तिरुवनंतरपुरममधील पाचव्या टी 20i सामन्यात धमाका केला. भारताच्या चौघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 271 पर्यंत मजल मारलीय.

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात वर्ल्ड कपआधी धमाका केलाय. सूर्यासेनेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढत 20 ओव्हरमध्ये 270 पार मजल मारली आहे. इशान किशन याचा शतकी तडाखा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याचं वादळी अर्धशतक या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावांचा डोंगर उभा केलाय. तसेच अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या याने 42 धावा करत फिनिशिंग टच दिला. टीम इंडिया या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया हा सामना किती धावांनी जिंकते? यासाठी थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
संजूकडून पुन्हा निराशा, ओपनर घरच्या मैदानात ढेर
तिरुवनंतरपुरममधील पाटा खेळपट्टी असल्याने चाहत्यांचं लक्ष हे टॉसकडे लागून होतं.अशात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घ्यावा, अशीच चाहत्यांना आशा होती, अगदी झालंही तसंच. कॅप्टन सूर्याने न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली. संजू गेल्या 4 सामन्यांमध्ये अपयशी ठरल्याने त्याच्याकडून होम ग्राउंडमध्ये मोठ्या खेळीची आशा होती. तसेच त्याच्या कामगिरीकडे चाहत्यांची करडी नजर होती. मात्र संजू घरच्या मैदानातही अपयशी ठरला. संजू अवघ्या 6 धावा करुन माघारी परतला.
ओपनर अभिषेक शर्मा यालाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र अभिषेक या खेळीला मोठ्या आकड्यात बदलण्यात अपयशी ठरला. अभिषेक 30 धावा करुन बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या दोघांनी न्यूझीलंडला झोडून काढला.
तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
इशान आणि सूर्या या दोघांनी मैदनात चौफेर फटकेबाजी करत शतकी भागीदारी केली. इशान-सूर्याने तिसऱ्या विकेटसाठी 57 बॉलमध्ये 137 रन्सची पार्टनरशीप केली. सूर्या आऊट झाल्याने ही भागीदारी मोडीत निघाली. सूर्याने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 63 रन्स केल्या.
त्यानंतर इशानने हार्दिकसह शतक पूर्ण केलं. इशानचं हे पहिलंवहिलं टी 20i शतक ठरलं. मात्र इशान शतकानंतर आऊट झाला. इशानने 43 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 6 फोरसह 103 रन्स केल्या. हार्दिकनेही न्यूझीलंडचा चांगलाच समाचार घेतला. हार्दिकने 4 सिक्स आणि 1 फोरसह 17 बॉलमध्ये 42 रन्स केल्या. तर रिंकु सिंह (8) आणि शिवम दुबे (7) ही जोडी नाबाद परतली. न्यूझीलंडसाठी लॉकी फर्ग्यूसन याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.
