
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20I मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार याने बॅटिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला फिल्डिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांनी या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20I वर्ल्ड कप आधी शेवटचा सामना आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. टीम मॅनेजमेंटने लोकल बॉय असलेला ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवलं आहे. संजू पहिल्या 4 सामन्यात अपयशी ठरला. संजूला 4 सामन्यात 40 धावाच करता आल्या. मात्र त्यानंतरही टीम मॅनेजमेंटने संजूवर विश्वास दाखवत त्याला कायम ठेवलंय. त्यामुळे संजू आपल्या घरच्या मैदानात वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या सामन्यात धमाका दाखवणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
त्याशिवाय टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्फोटक फलंदाज इशान किशन आणि उपकर्णधार-ऑलराउंडर अक्षर पटेल यांचं कमबॅक झालं आहे. इशानने साधारण दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर रहावं लागलं होतं. तर अक्षरला नागपूरमधील पहिल्या टी 20I सामन्यात हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्यानंतर सलग 3 सामन्यांना मुकावं लागलेलं. संजू, इशान आणि अक्षरमुळे हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव या तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावं लागलं आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिलाच सामना हा 7 तारखेलाच खेळणार आहे. त्यामुळे टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपच्या प्लेइंग ईलेव्हनसहच मैदानात उतरलीय, असं म्हटलं जात आहे.
तसेच न्यूझीलंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 बदल केले आहेत. डेव्हॉन कॉनव्हे याच्या जागी फिन एलन, मार्क चॅपमनच्या जागी बेवन जेकब्स, झॅकरी फॉल्क्सऐवजी कायल जेमिसन आणि मॅट हेन्रीच्या जागी लॉकी फर्ग्यूसन याला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), टीम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेव्हॉन जेकब्स, काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन आणि जेकब डफी.