IND vs PAK : शुक्रवारी टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, वर्ल्ड कप विजेत्या संघातील दोघांचा समावेश, कॅप्टन कोण?
India vs Pakistan Live Streaming Hong Kong Sixes 2025 : शुक्रवारी टीम इंडिया आणि पाकिस्तान 2 संघ हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत.

भारतीय संघाने सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत करत आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर वूमन्स टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. चाहत्यांना कायमच या 2 देशांच्या क्रिकेट संघांत होणाऱ्या सामन्याची प्रतिक्षा असते. आता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार सामना कधी आणि कुठे होणार? दोन्ही संघ कोणत्या स्पर्धेत आमनेसामने असणार? हे जाणून घेऊयात.
हाँगकाँग सिक्सेस 2025 या स्पर्धेच्या थरार 7 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. तर 9 नोव्हेंबरला महाअंतिम सामना होणार आहे. या 3 दिवसांमध्ये एकूण 29 सामने होणार आहेत. स्पर्धेत एका ट्रॉफीसाठी 12 संघ भिडणार आहेत. या 12 संघांना 3-3 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान हाँगकाँग विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे. मात्र चाहत्यांचं लक्ष हे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे.
स्पर्धेबाबत महत्त्वाची माहिती
हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेला 1990 साली सुरुवात झाली. या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा फक्त 6 ओव्हरचा असतो. प्रत्येक संघाला फक्त 36 चेंडू खेळण्याची संधी मिळते. तसेच या स्पर्धेसाठी एका संघात फक्त 6 खेळाडूंनाच खेळता येतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या स्पर्धेत निवृत्त खेळाडूच सहभागी होऊ शकतात. स्पर्धेतील पहिल्या दिवशीच अनेक सामने होणार आहेत. मात्र टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा होणार? हे जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शुक्रवारी 7 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मोंग कोकमधील मिशन रोड ग्राउंडमध्ये होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात होईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच सोनी लिव्ह आणि फॅनकोड एपद्वारे हा सामना मोबाईलवर लाईव्ह पाहता येईल.
टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?
टीम इंडियाला या स्पर्धेत सी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त कुवेतचा समावेश आहे. प्रत्येक गटातील 2 अव्वल संघ उपांत्य पूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर बाद फेरीचा थरार रंगेल.
वर्ल्ड कप विजेत्या संघातील 2 खेळाडूंचा समावेश
दरम्यान या स्पर्धेसाठी भारतीय संघात 2 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. दिनेश कार्तिक आणि रॉबिन उथ्पपा हे दोघेही या स्पर्धेत खेळणार आहेत. हे दोघे 2007 च्या टी 20I क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य आहेत. दिनेश कार्तिक या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तसेच शहबाज नदीम, स्टूअर्ट बिन्नी, प्रियांक पांचाल आणि भरत चिपली यांचाही समावेश आहे.
