
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानेला दुखापत झाली. त्यामुळे शुबमनला या दुखापतीनंतर उर्वरित सामन्यात खेळता आलं नाही. शुबमनच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऋषभ पंत याने नेतृत्व केलं. भारताला कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये झालेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवशी पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 30 धावांनी मात केली. भारताला या 124 धावांचा पाठलागही करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने भारतात यासह 15 वर्षांनी कसोटी सामन्यात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. हा सामना गुवाहाटातील बारसपारा स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोट्सनुसार, शुबमन गिल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, मानेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. शुबमन या दुखापतीनंतरही कोलकातावरुन टीमसह गुवाहाटीला आला आहे. मात्र शुबमन या सामन्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. आधी शुबमन खेळणार की नाही? याबाबत टीम मॅनेजमेंट 21 नोव्हेंबरला अर्थात सामन्याच्या 1 दिवसआधी ठरवण्यात येईल, असं म्हटलं जात होतं. मात्र आता शुबमन गुवाहाटी कसोटीतून बाहेर झाल्याचा म्हटलं जात आहे.
शुबमनला पहिल्या कसोटीदरम्यान झालेल्या दुखापतीनंतर उर्वरित सामन्यात ऋषभ पंत याने नेतृत्वाची सूत्रं हाती घेतली होती. आता गिल दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने पंत दुसऱ्या कसोटीत नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. पंतची कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
शुबमनला कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात बॅटिंग करताना मानेला झटका लागल्यासारखं जाणवलं. शुबमनने स्वीप शॉट मारला. या प्रयत्नात शुबमनच्या मानेवर ताण आला. त्यामुळे शुबमनला तीव्र वेदना झाल्या. त्यामुळे शुबमनला 4 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर शुबमन परत बॅटिंगसाठी येण्याच्या स्थितीत नव्हता. शुबमनला त्यानंतर कोलकातातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शुबमनवर आवश्यक उपचार केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान शुबमन गिल याच्या जागी दुसऱ्या कसोटी सामन्यात साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांपैकी कुणालाही संधी दिली जाऊ शकते.