Rahul Dravid च्या मंत्राने बिझनेसमनच्या मुलाचं स्वप्न साकार, ‘तू तुझ्या डोक्यात कधी….’
बिझनेसमनच्या मुलाच्या करिअरमध्ये राहुल द्रविड यांचा महत्त्वाचा रोल आहे. कोण आहे हा मुलगा? आणि त्याला यशस्वी होण्यासाठी काय सांगितलं?

मुंबई: वडिल बिझनेसमॅन, मुलगा क्रिकेटर. मुलाने उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर बनावं, अशी वडिलांची इच्छा होती. पण त्याच्या नशिबात क्रिकेटर होणं लिहिलं होतं. हा मुलगा क्रिकेट विश्वात आपली ओळख बनवायला निघाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताच त्याची चर्चा सुरु झालीय. या युवा क्रिकेटरच नाव आहे, शिवम मावी. मावीचे वडिल पेशाने उद्योजक. या बिझनेसमनच्या मुलाच करिअर घडवण्यात राहुल द्रविड यांचा महत्त्वाचा रोल आहे. राहुल द्रविड यांच्या मंत्रामुळे शिवम मावीला करिअरमध्ये उंची गाठण्यात मदत झाली.
6 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होता
शिवम मावी भारताकडून अंडर 19 क्रिकेट खेळला. त्यानंतर तो आयपीएलमध्ये आला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताच त्याने धमाका केलाय. शिवम मावीने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी 20 मॅचमध्ये डेब्यु केला. पहिल्याच सामन्यात त्याने 4 विकेट काढल्या. या यशानंतर त्याची चर्चा सुरु झालीय. शिवम मागच्या 6 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होता. इंजरी झाल्यानंतर इंडियाकडून खेळता येईल का? याबद्दल मनात थोडी चलबिचल झाली होती. पण आता स्वप्न साकार झालय.
सर्वप्रथम द्रविड यांनीच हेरल होतं टॅलेंट
आता शिवम मावीची चर्चा सुरु आहे. पण त्याला इथपर्यंत आणण्यात राहुल द्रविड यांचं सुद्धा योगदान आहे. स्वत: शिवम मावीने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. द्रविड यांनी दिलेला सक्सेस मंत्र कायम लक्षात आहे, असं मावी म्हणाला होता. द्रविड आता हेड कोच आहेत. त्यांनी मावीला आता हा मंत्र दिलेला नाही. शिवम मावी अंडर 19 मध्ये खेळायचा, त्यावेळी द्रविड यांनी त्याला हा मंत्र दिला होता. द्रविड यांनी काय मंत्र दिला?
शिवम अंडर 19 खेळायचा, त्यावेळी राहुल द्रविड यांनी त्याच्यातल टॅलेंट हेरलं होतं. मावीच्या गोलंदाजीची त्यावेळी चर्चा सुरु झालेली. मावी दिशा भरकटू नये, म्हणून द्रविड यांनी त्याला एक मोलाचा सल्ला दिला होता. “डोक्यात कधी पैशाच भूत जाणार नाही, याची काळजी घे. फक्त क्रिकेटवर लक्ष दे. जितकं क्रिकेटवर लक्ष केंद्रीत ठेवशील, तितका पैसा येईल” असा मंत्र द्रविड यांनी दिला होता.
