
आशिया कप 2025 स्पर्धेनंतर आता भारतीय चाहत्यांना वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. प्रत्येक सामन्याआधी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना असते. कॅप्टन शुबमन गिल याने सामन्याच्या 1 दिवसआधी 1 ऑक्टोबरला प्लेइंग ईलेव्हनबाबत भाष्य केलं आहे.
विंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी शुबमनने प्लेइंग ईलेव्हनबाबत रणनिती सांगितली आहे. एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह खेळणार असल्याचे संकेत शुबमनने दिले आहेत. शुबमनने या व्यतिरिक्त आणखी काय काय सांगितलं? हे जाणून घेऊयात.
“तुम्हाला उद्या (2 ऑक्टोबर) प्लेइंग ईलेव्हनबाबत समजेल. परिस्थिती आणि हवामान पाहता आम्ही 1 अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह खेळण्यासाठी तयार आहोत”, असं शुबममने पत्रकार परिषदेत म्हटलं.
शुबममने भारताचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याबाबतही भाष्य केलं आहे. बुमराह याआधी इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 5 पैकी 3 कसोटी सामन्यांमध्येच खेळला होता. त्यामुळे बुमराह विंडीज विरुद्ध किती सामन्यात खेळणार? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबतही शुबममने माहिती दिली.
“बुमराहला खेळवण्याबाबतचा निर्णय हा प्रत्येक सामान्यानंतर घेतला जाईल. बुमराहने एका कसोटी सामन्यात किती ओव्हर बॉलिंग केलीय? तसेच त्याला कसं वाटतंय? या निकषांवरुन बुमराहबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र अद्याप काहीही निश्चित नाही”, असंही शुबमनने नमूद केलं.
उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्या सामन्यानंतर दुसरा आणि अंतिम सामना 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीचा भाग आहे.
दरम्यान पाहुण्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला या मालिकेआधीच 2 झटके लागले आहेत. वेस्ट इंडिजच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. शामर जोसेफ आणि अल्झारी जोसेफ या दोघांना दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. हे दोघेही भारत दौऱ्यावर नसल्याने विंडीजच्या अडचणीत वाढ झाली आहे. शामर आणि अल्झारीच्या जागी 2 युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.