
भारताने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 2-2 ने रोखण्यात यश मिळवलं होतं. आता मायदेशात टीम इंडियाची परीक्षा असणार आहे. कारण न्यूझीलंडने 3-0 ने मात देत 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपच्या आशेवर पाणी टाकलं होतं. त्यामुळे आता भारतीय संघाला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 2-0 जिंकणं भाग आहे. नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विजयी टक्केवारीत घसरण होईल. त्यामुळे टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया शुबमन गिलच्या नेतृत्वात तयार आहे. शुबमन गिलने वेस्ट इंडिजला इशारा देत सांगितलं की, टीम इंडिया कठीण क्रिकेट खेळण्यास सज्ज आहे.
“कोणतेही सोपे पर्याय नाहीत, आम्हाला कठीण क्रिकेट खेळायचे आहे. इंग्लंडमधील प्रत्येक कसोटी शेवटपर्यंत गेली आणि आम्ही तेच कठीण क्रिकेट खेळण्यास तयार आहोत. भारतात, आम्ही एका वर्षानंतर खेळत आहोत, प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे आणि आम्हाला या मालिकेवर वर्चस्व गाजवायचे आहे.”, असं कर्णधार शुबमन गिल म्हणाला. दुसरीकडे, आशिया कप जिंकल्यानंतर लगेचच कसोटी मालिका खेळणे खेळाडूंसाठी आव्हानात्मक असेल, असे गिल म्हणाला. ‘ही कसोटी लवकर आली. मला फक्त स्वतःला योग्य स्थितीत आणायचे होते. फॉर्मेट बदलणे हे तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर मानसिकदृष्ट्याही तालमेल राखण्याचं मोठे आव्हान आहे.’, असं शुबमन गिलने सांगितलं.
शुबमन गिलने प्लेइंग 11 बाबतही थोडीशी कल्पना दिली. ‘उद्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली जाईल. हवामान आणि परिस्थिती आम्हाला वेगवान गोलंदाजांना खेळवण्यास भाग पाडत आहे. खेळपट्टीवरील ओलावा पाहून उद्या अंतिम निर्णय घेतला जाईल.’ असं शुबमन गिल म्हणाला. शुबमन गिलने संकेत दिले की परिस्थितीनुसार भारत एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. इंग्लंड दौऱ्यात असलेल्या संघात बराच बदल झाला आहे. ऋषभ पंत दुखापतीमुळे नाही. तर करूण नायरला डावलण्यात आलं आहे. त्यामुळे आता संघ बांधणी करत मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे.