IND vs WI : टीम इंडियाला जेतेपद मिळवून देणारा खेळाडू आता प्लेइंग 11 मधून बाहेर? गिल-गंभीरपुढे पेच
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण प्लेइंग 11 बाबत पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे. चॅम्पियन खेळाडू बेंचवर बसणार की खेळणार असा प्रश्न आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील भारताची ही दुसरी मालिका आहे. इंग्लंड कसोटी मालिकेनंतर भारत मायदेशी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. मायदेशी मालिका असल्याने भारतीय संघ विजयाचा दावेदार आहे. पण मागच्या पर्वात न्यूझीलंडने भारताच्या अंतिम फेरीतील प्रवासात खोडा घातला होता. त्यामुळे आता भारतीय संघाला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर तशीच अपेक्षा भारतीय संघाकडून आहे. भारताने ही मालिका 2-0 ने जिंकावी अशी इच्छा क्रीडाप्रेमींची आहे. दुसरीकडे, या मालिकेसाठी प्लेइंग 11 निवडणं शुबमन गिल आणि गौतम गंभीरसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण आता स्टार गोलदाजांला प्लेइंग 11 मधून बाहेर कसं ठेवायचं असा प्रश्न असेल. आशिया कप स्पर्धेत या गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कुलदीप यादव आहे.
भारतातील खेळपट्ट्या या फिरकीपटूंना अनुकूल आहेत. त्यामुळे फिरकीच्या जोरावरच टीम इंडिया सामना काढू शकते. असं असूनही कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. कारण टीम इंडियाला फलंदाजीत खोली हवी आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याच्या दृष्टीने टीम इंडियाची ही रणनिती आहे. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंवर जास्त विश्वास टाकला जात आहे. फिरकीची जबाबदारी अनुभवी रवींद्र जडेजाच्या खांद्यावर असेल. त्यात तो उपकर्णधार आहे. तर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू आणि फिरकीची जबाबदारी सांभाळतात.
कुलदीप यादव इंग्लंड दौऱ्यात पाचही सामने बेंचवर बसला होता. तर वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजीसोबत गोलंदाजीतही कमाल केली होती. दुसरीकडे, अक्षर पटेलने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रेड बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये त्याला पसंती दिली जाऊ शकते. दुसरीकडे, वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यात जसप्रीत बुमराहसोबत मोहम्मद सिराज असेल. या शिवाय इतर वेगवान गोलंदाजांचा विचार होणं कठीण आहे.
अशी असू शकते प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
