IND vs WI : आशिया कप स्पर्धेत फलंदाजीत फेल गेल्यानंतर शुबमन गिलचा मोठा निर्णय, आता…
आशिया कप स्पर्धेत शुबमन गिलची बॅट काही चालली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, या समस्येचं समाधान शोधण्यासाठी शुबमन गिलने एक योजना आखली आहे. अहमदाबादमध्ये नेट प्रॅक्टिस करताना त्याने नवी रणनिती अवलंबली.

आशिया कप स्पर्धा संपल्यानंतर आता वेध लागले आहेत ते भारत वेस्ट कसोटी मालिकेचे… ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 च्या अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेतील पहिला सामना 2 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. भारतीय खेळाडूंनी मायदेशी परतल्यानंतर जोरदार सराव सुरु केला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ नरेंद्र मोदीमध्ये सराव शिबिरात सहभागी झाले. फक्त तीन खेळाडू या सराव शिबिरापासून दूर राहिले. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी आराम केला. दुसरीकडे, कर्णधार शुबमन गिल याने चांगलाच घाम गाळला. आशिया कप स्पर्धेत शुबमन गिलची बॅट काही चालली नाही. त्याला अर्धशतक काही ठोकता आलं नाही. तसेच मोक्याच्या क्षणी विकेट टाकून मोकळा झाला. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. आता या टीकेला उत्तर देण्यासाठी शुबमन गिल जोरदार तयारी करत आहे.
शुबमन गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी खास रणनिती अवलंबली आहे. त्याने अहमदाबादमध्ये वारंवार नेट्स बदलले. कधी वेगवान मारा,तर कधी फिरकीपटूंचा सामना करत तयारी केली. त्याने थ्रो डाउंसच्या विरुद्धही सराव केला. पण यावेळी शुबमन गिलला फलंदाजी करताना थोडा त्रास जाणवला. काही चेंडू त्याच्या जवळून निघून गेले. काही चेंडूंना कट लागली. त्यामुळे शुबमन गिल आणि त्याच्या चाहत्यांसाठी चिंतेची बाब आहे. शुबमन गिलने इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकल्यास विजयी टक्केवारीत वाढ होणार आहे.
शुबमन गिल फॉर्मबाबत थोडी चिंता असली तरी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी चांगली फलंदाजी केली. या दोघांचा सराव पाहता टीम इंडियाला फायदा होईल असं दिसत आहे. इतकंच काय तर साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनीही चांगली फटकेबाजी केली. दुसरीकडे, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी नेटमध्ये 45 मिनिटे गोलंदाजी केली. त्यामुळे या खेळाडूंकडून फार अपेक्षा आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडने 3-0 ने पराभूत केल्यानंतर घरच्या मैदानावर ही पहिलीच कसोटी मालिका आहे.
