ऋषभ पंतचं 99 दिवसानंतर कमबॅक, पण 20 चेंडूत खेळ खल्लास; झालं असं की…
IND-A vs SA-A: भारत ए आणि दक्षिण अफ्रिका ए संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतून ऋषभ पंतने क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा पाय रोवले आहेत. पण कमबॅकचा सामना काही खास ठरला नाही. फक्त 20 चेंडूत त्याचा डाव संपुष्टात आला.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंत गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर होता. आता पुन्हा एकदा दुखापतीतून सावरून मैदानात उतरला आहे. आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यापूर्वी दक्षिण अफ्रिका ए संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यामुळे त्याच्या खेळीकडे लक्ष लागून होते. पण ऋषभ पंतच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. ऋषभ पंतचा डाव अवघ्या 20 चेंडूतच संपुष्टात आला. दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 309 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया ए संघाने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रेने 76 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनने 32 धावा केल्या. पण त्यानंतर भारताचा डाव गडबडला. पडिक्कल, रजत पाटीदार, ऋषभ पंत काही खास करू शकले नाहीत. 99 दिवसानंतर मैदानात उतरलेल्या ऋषभ पंतचा डाव अवघ्या 20 चेंडूत संपला.
इंडिया ए संघाचा कर्णधार ऋषभ पंतने 20 चेंडूत 2 चौकार मारत 17 धावांची खेळी केली. ओकुहले सेलेच्या गोलंदाजीवर झुबैर हमजाने त्याचा झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवला. इंडिया ए संघाने सर्व गडी गमवून 234 धावा केल्या. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात 75 धावांची आघाडी मिळाली आहे. ऋषभ पंतकडून दुसऱ्या डावात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.दरम्यान, भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात नोव्हेंबर महिन्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऋषभ पंतची संघात निवड होण्याची शक्यता आहे. पण त्याची खेळी पाहता त्याला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत आता शंका आहे. ऋषभ पंतला आणखी काही काळ संघात परतण्यासाठी वाट पाहावी लागू शकते.
ऋषभ पंत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला तीन महिन्यांचा अवधी लागला. दरम्यान, इंडिया ए चा कर्णधार ऋषभ पंत आतापर्यंत 73 फर्स्ट क्लास सामने खेळला आहे. त्यातील 66 डावात त्याने 47.06 च्या सरासरीने 5365 धावा केल्या आहेत. यात 13 शतकं आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.
