
भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू केली होती. आता तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत लिटमस टेस्ट झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीत आपला जम बसवला आहे. असं असलं तरी न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात एक गोष्ट मात्र चिंतेची बाब ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत फटका बसू शकतो. गेल्या काही सामन्यात ही चूक अधोरेखित झाली होती. आता न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात त्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे वेळीच चूक दुरूस्त करणं गरजेचं आहे. ही चूक काहीही करून टी20 मालिकेतच दुरूस्त करावी लागेल. अन्यथा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याचा मोठा फटका बसेल. ही चूक म्हणजे गचाळ क्षेत्ररक्षण..
नागपूरमधील टी20 मालिकेत टीम इंडियाने 238 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या गाठणं काही न्यूझीलंडला जमलं नाही. पण 190 धावांपर्यंत मजल मारली. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. खरं तर हे अंतर आणखी असतं. कारण न्यूझीलंडने 190 धावांपर्यंत मजल मारताना भारताने गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडवलं. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमॅनने आक्रमक खेळी केली. एक वेळ तर अशी आली होती की फिलिप्स सामना पाटलतो की काय? असं वाटलं होतं. कारण भारतीय संघाकडून एक दोन नाही तर बऱ्याच चुका झाल्या. यात दोन वेळा रनआऊटची संधी सोडली. यात एक जीवदान फिलिप्स मिळालं. संजू सॅमसनने त्याला धावचीत करण्याची सोपी संधी सोडली. तेव्हा फिलिप्स फक्त 41 धावांवर होता. पण त्यानंतर 78 धावा करून बाद झाला.
रिंकु सिंहने मार्क चॅपमॅनचा सोपा झेल सोडला. त्यावेळी तो फक्त 16 धावांवर होता. त्यानंतर त्याने 37 धावांची खेळी केली. अभिषेक शर्माने 16व्या षटकात मिशेलचा झेल सोडला. तेव्हा फक्त 4 धावांवर होता. त्यानंतर, 19व्या षटकात इशान किशननेही त्याचा झेल सोडल्याने क्रीडाप्रेमींनी डोक्यावर हात मारला. पण धावसंख्या जास्त असल्याने या चुका झाकल्या गेल्या. असंच जर सुरू राहिलं तर मोठी धावसंख्या करूनही फार काही उपयोग होणार नाही.