WTC Final 2021 | पहिल्या दिवशी पावसाचा खोडा, खेळ रद्द, उद्या 98 षटकं खेळवणार

साऊथॅम्प्टनमधील पाऊस थांबला असला तरी मैदानावर पाणी असल्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

WTC Final 2021 | पहिल्या दिवशी पावसाचा खोडा, खेळ रद्द, उद्या 98 षटकं खेळवणार
southampton cricket stadium

साऊथॅम्प्टन : पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना (WTC Final 2021) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) या उभय संघांमध्ये साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळवला जाणार आहे. वास्तविक आज या सामन्याला सुरुवात होणार होती. परंतु पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. उद्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आयसीसीने या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला होता. त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार हा सामना 19 जून ते 23 जूनदरम्यान खेळवला जाऊ शकतो. (India vs New Zealand WTC Final : Play on Day 1 call off due to rain, wet outfield)

दरम्यान, आज संध्याकाळी साऊथॅम्प्टनमधील पाऊस थांबला असला तरी मैदानावर पाणी असल्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विटवरून आजच्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याची माहिती दिली आहे. सुरुवातीला केवळ पहिल्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आला होता. त्यानंतर लंचनंतर खेळाला सुरुवात होईल, असं सांगण्यात येत होतं. परंतु मैदानावर पाणी साचल्यामुळे नाईलाजास्तव आजच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

आज सकाळपासूनच साऊथॅम्पटनमध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे नाणेफेकदेखील झाली नाही. मैदानावरील पंचांनी वेळोवेळी खेळपट्टी खेळण्यासाठी योग्य आहे का, याची पाहणी केली. परंतु खेळपट्टी आणि मैदाना दोन्हीही आजचा खेळ खेळण्यासाठी योग्य नसल्याने आजचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या दिवशी 98 षटकांचा खेळ

दरम्यान, आता पहिला दिवसाचा खेळ वाया गेल्यामुळे या दिवसाची भरपाई ही राखीव दिवसात केली जाणार आहे. या महामुकाबल्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या दिवशी एकूण 98 षटकांचा खेळ होणार आहे. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात प्रत्येकी 15 मिनिटं असे एकूण 30 मिनिटं अतिरिक्त खेळ होणार आहे.

अंतिम सामन्यासाठीची टीम इंडिया (Team India Playing Eleven)

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक) , रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

संबंधित बातम्या

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

WTC 2021 : 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलचा बदला घेणार का टीम इंडिया?, पाहा काय घडलं होतं त्या दिवशी..!

(India vs New Zealand WTC Final : Play on Day 1 call off due to rain, wet outfield)