न्यूझीलंडनंतर भारतीय संघ आणखी एक वनडे मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर

भारतीय संघ आणि बीसीसाआयचं पुढचं वेळापत्रक व्यस्त आहे. एका पाठोपाठ एक धडाधड स्पर्धा आहेत. असं असताना आणखी एका वनडे आणि टी20 मालिकेचं वेळापत्रक समोर आहे. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा एकदा मैदानात पाहता येणार आहे.

न्यूझीलंडनंतर भारतीय संघ आणखी एक वनडे मालिका खेळणार, वेळापत्रक जाहीर
| Updated on: Jan 02, 2026 | 4:18 PM

India vs Bangladesh Series: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील वाद गेल्या काही महिन्यात टोकाला गेले आहेत. बांगलादेशमधील परिस्थिती पाहता भारताने मागच्या वर्षी दौरा रद्द केला होता. दुसरीकडे आयपीएलमध्ये केकेआर संघात मुस्तिफिजुर रहमान याला स्थान मिळाल्याने वादाला फोडणी मिळाली आहे. असं सर्व असताना भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मालिकेमुळे आणखी एका वादाला फोडणी मिळू शकते. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने ही माहिती देत 2 जानेवारीला वेळापत्रक जाहीर केलं आहे. माहितीनुसार, भारतीय संघ सप्टेंबर महिन्यात बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका आणि टी20 मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसतील.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या माहितीनुसार, भारत-बांग्लादेश यांच्यातील वनडे मालिका 1 सप्टेंबर,3 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरला खेळली जाणार आहे. तर टी20 मालिका 9 सप्टेंबर, 12 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबरला खेळली जाईल. पण या दौऱ्याला अजून 8 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे या आठ महिन्यात काही मोठ्या घडामोडी घडल्या तर हा दौरा रद्द होऊशकतो. भारतीय संघ 2022-23 मध्ये शेवटचं बांग्लादेश दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात भारतीय संघाचा वनडे मालिकेत पराभव झाला होता. बांगलादेशने ही वनडे मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली होती. बांगलादेशमध्ये त्यांच्या भूमीत भारताचा चांगला रेकॉर्ड आहे. भारताने 25 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. एक सामना अनिर्णित ठरला.

बांगलादेशमधील घडामोडीनंतर भारतात बांगलादेशी खेळाडूंचा विरोध होत आहे. असं असूनही आयपीएल 2026 लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने मुस्तिफिझुर रहमानला 9.2 कोटी रुपयात खरेदी केलं होतं. या व्यतिरिक्त कोणत्याही बांग्लादेशी खेळाडूला आयपीएलमध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे केकेआर फ्रेंचायझीवर टीकेची झोड उठली आहे. याचे तीव्र पडसाद राजकीय पटलावर उमटले आहेत. दुसरीकडे, बीसीसीआयने स्पष्ट केलं की, बांगलादेशी खेळाडूंवर कोणतीही बंदी घातली जाणार नाही.