शुबमन गिलकडे कर्णधारपद, वनडे मालिकेपूर्वी खेळणार दोन सामने
शुबमन गिल आणि दुखापत हे आता समीकरण ठरलं आहे. वारंवार दुखापतग्रस्त होत असल्याने कर्णधार असूनही त्याचं संघातील स्थान डळमळीत होताना दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळला नाही. तर टी20 मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने उर्वरित सामन्यात मैदानात उतरला नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा 3 जानेवारीला केली जाणार आहे. या मालिकेत शुबमन गिल कमबॅक करणार असून त्याच्याकडेच कर्णधारपदाची धुरा असणार आहे. दुखापतीमुळे शुबमन गिल वनडे मालिकेत खेळला नव्हता. त्यानंतर टी20 मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली. पण दुखापतीमुळे शेवटच्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. इतकंच या दुखापतीमुळे टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप खेळण्याचं त्याचं स्वप्न भंगलं. आता शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध वनडे मालिका खेळणार हे निश्चित आहे. पण या वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिल विजय हजारे ट्रॉफीत भाग घेणार आहे. सलग दोन सामन्यात भाग घेणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे त्याला पुन्हा लय प्राप्त करण्यास मदत होणार आहे.
टी20 मालिकेत शुबमन गिलच्या पायाला दुखापत झाली होीत. तेव्हापासून शुबमन गिल पंजाब संघासोबत सराव करत आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या इतर खेळाडूंप्रमाणे शुबमन गिल पंजाब संघाकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळणार आहे. पंजाबचे ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने आहे. हे सामने 3 जानेवारी, 6 जानेवारी आणि 8 जानेवारीला होणार आहे. यात शुबमन गिल 3 आणि 6 जानेवारीला खेळणार आहे. कारण त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल. त्यासाठी शुबमन गिल भारतीय संघासोबत असेल. रिपोर्टनुसार वनडे मालिकेसाठी टीम इंडिया 7 जानेवारीला टीम इंडियासोबत एकत्र असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात गिल खेळणार नाही.
पंजाबचा 3 जानेवारीला सामना सिक्किम विरूद्ध होणार आहे. त्यानंतर 6 जानेवारीला गोव्याविरूद्ध सामना असणार आहे. या सामन्यात शुबमन गिलच नाही तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगही खेळण्याची शक्यता आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची वनडे मालिकेत निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्शदीप सिंग न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकप 2026 साठी टीम इंडियाचा भाग आहे. त्यामुळे त्याची वनडे संघात निवड होते की त्याला आराम दिला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
