टीम इंडिया बदलणार! टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील चूक सुधारण्याची शेवटची संधी
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून होणार असून बीसीसीआयने टीम इंडियाची निवड केली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात काही खेळाडूंना संधी मिळाली नाही. पण अजूनही संघ बदलण्याची संधी आहे. कसं काय ते समजून घ्या.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. जेतेपद कायम राखण्यासाठी टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ पाच सामन्याची टी20 मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेतून भारतीय संघाला आपली बांधणी मजबूत करता येणार आहे. इतकंच काय तर संघात काही बदल करायचा असेल तर एक संधी आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि भारतीय संघाचे व्यवस्थापकांकडे चूक दुरूस्त करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडियात बदल केला जाऊ शकतो. तसं पाहिलं तर एक महिन्याआधीच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाची घोषणा करावी लागते. पण आयसीसी टी20 स्पर्धेसाठी 31 जानेवारीपर्यंत संघ फायनल करता येणार आहे. सर्व संघ 31 जानेवारीपर्यंत संघात बदल करू शकतात. त्यामुळे भारतीय संघातही बदल होऊ शकतो.
कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फेल गेला तरी त्याला काही काढता येणार नाही. पण त्यावरून वादंग झाला तर बीसीसीआय निर्णय घेण्याची एक संधी आहे. कारण आयसीसीला अधिकृत संघ देण्याचा अवधी 31 जानेवारीपर्यंत आहे. या व्यतिरिक्त इतर खेळाडू चांगल्या फॉर्मात आहे.कारण दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या टी20 मालिकेनंतरच संघाला चाळण लावली आहे. त्यामुळेच शुबमन गिलचा टी20 संघातून पत्ता कापला गेला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत एखाद दुसरा खेळाडू फेल गेला तरी त्यात बदल केला जाणार नाही. पण दुखापत वगैरे झाली तर संघात बदल केला जाऊ शकतो.
आयसीसीच्या नियमांनुसार, स्पर्धेतील सहभागी संघांना स्पर्धा सुरू होण्याच्या सुमारे एक महिना आधी त्यांचा प्रारंभिक संघ सादर करावा लागतो. 31 जानेवारीपर्यंत संघात बदल करता येतो. निवडकर्त्यांना फॉर्म, फिटनेसची चिंता असल्यास बदल करण्याची लवचिकता मिळेल. 31 जानेवारीच्या कटऑफपूर्वी आयसीसीच्या मंजुरीशिवाय त्यांच्या संघात बदल करू शकतो. हा नियम सर्व सहभागी देशांना समान रीतीने लागू आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार),रिंकु सिंह, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, हार्षित राणा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती
