
मुंबई : भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाशी कसोटी सामना सुरु आहे. कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताची मजबूत पकड दिसून आली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या षटकातच फोइबे लिचफिल्डला बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. बेथ मूने आणि तहिला मॅग्राने चांगली भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 219 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात भारताने दिवसअखेर एक गडी गमवून 98 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही 121 धावांची आघाडी आहे. पण स्मृती मंधाना आणि स्नेह राणा मैदानात असल्याने ही धावसंख्या सहज गाठून आघाडी घेईल, अशी अपेक्षा आहे. स्मृती मंधाना नाबाद 43 आणि स्नेह राणा नाबाद 4 धावांवर खेळत आहे. तर शफाली वर्मा 40 धावांवर असताना जेस जोनासेनच्या गोलंदाजीवर तंबूत परतली.
बेथ मूने आणि फोइबे लिचफिल्ड ही जोजी मैदानात उतरली होती. पण फोईबे डायमंड डकवर बाद झाली. एकही चेंडू न खेळता धावचीत झाली. त्यानंतर आलेली एलिसा पेरीही काही खास करू शकली नाही. अवघ्या 4 धावांवर बाद झाली. त्यानंतर बेथ आणि तहिला मॅग्रा यांनी डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी केली. मॅग्राने अर्धशतकी खेळी केली पण त्यानंतरच्या चेंडूवर स्नेह राणाने तिला तंबूचा रस्ता दाखवला. बेथने एलिसा हीलीसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण 40 धावांवर असताना पूजा वस्त्राकारने बाद केलं.
एलिसा हीली 38, अन्नाबेल सुथरलँड 16, एशले गार्डनर, जेस जोनासेन 19, एलाना किंग 5, लॉरेन चिटल 6 धावांवर बाद झाले. तर किम गार्थ ही नाबाद 28 धावांवर राहिली. भारताकडून पूजा वस्त्राकारने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर स्नेह राणाने 3 आणि दीप्ती शर्माने 2 गडी बाद केले.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, एलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), एनाबेल सुथरलँड, एशले गार्डनर, जेस जोनासेन, एलाना किंग, किम गर्थ, लॉरेन चीटल