ऋचा घोषची शेवटपर्यंत झुंज, एका फटक्याने शतक हुकलं पण टीम इंडियाची लाज राखली
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या दहाव्या सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने आले आहेत. या सामन्यात आठव्या क्रमांकावर उतरलेल्या ऋचा घोषने झुंजार खेळी केली. तिच्या खेळीमुळेच भारताने 251 धावांपर्यंत मजल मारली.

वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यात मधल्या फळीतील फलंदाजांनी झुंजार खेळी करून लाज राखली. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. आठव्या क्रमांकावर उतरलेल्या ऋचा घोषने झुंजार खेळी केली. भारताचे 6 विकेट फक्त 102 धावांवर गेले होते. त्यामुळे 150 धावांचा पल्ला गाठणार की नाही असंच वाटत होतं. पण ऋचा घोषने शेवटपर्यंत झुंज दिली. आठव्या क्रमांकावर उतरलेल्या ऋचा घोषने 77 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकार मारत 94 धावांची खेळी केली. तिचा स्ट्राईक रेट 122.07 होता.तिचं शतक फक्त 6 धावांनी हुकलं. पण ही खेळी शतकापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण वर्ल्डकप स्पर्धेत सन्मानजनक धावांचं आव्हान देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भारताचा डाव 150 धावात आटपेल असं वाटतं होतं. अनेकांनी तर आशाही सोडून दिल्या होत्या. पण रणरागिनी ऋचा घोष शेवटच्या षटकापर्यंत लढली. तिच्या खेळीमुळे टीम इंडियाला 251 धावापर्यंत मजल मारता आली.
ऋचा घोषने अमनजोत कौरसोबत सातव्या विकेटसाठी 51 धावांची आणि स्नेह राणासोबत आठव्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. ऋचा घोषने शेवटच्या षटकात शतकाच्या उंबरठ्यावर पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत 94 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्या चेंडूवर उत्तुंग फटका मारला, पण सीमेरेषेजवळ तिचा झेल पकडला. फुलटॉस चेंडूवर तिने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेवर असलेल्या एका क्षेत्ररक्षकाने पकडला. चेंडू खेळताना खूप वर होता आणि ऋचाने थेट पंचांकडे नो बॉलसाठी दाद मागितली. पंचांनी तिसऱ्या पंचाकडे कौल मागितला. ट्रॅकरच्या रिप्लेमध्ये नो-बॉलपेक्षा फक्त 4 सेंटीमीटर खाली असल्याचे दिसून आले. त्यामुळे ऋचा बाद असल्याचं घोषित केलं.
त्यामुळे तिचं शतकाचं स्वप्न भंगलं. पण ऋचाने माजी भारतीय महिला क्रिकेटपटू फौजीह खलीलीला मागे टाकले. तिने 1982 मध्ये इंग्लंडविरुद्ध 88 धावा केल्या होत्या.ऋचा घोषने वनडे क्रिकेटमध्ये 1000 धावांचा पल्ला गाठला आहे. महिलांच्या एकदिवसीय सामन्यात आठव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. याआधी क्लो ट्रायॉनने या वर्षाच्या सुरुवातीला कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 74 धावा केल्या होत्या.
