SRH vs MI : हरले पण लढले, मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, हैदराबादने उघडलं विजयाचं खातं
IPL 2024 SRH vs MI : आयपीएलच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांमध्ये लिहिल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाने हंगामातील पहिला विजय नोंदवला आहे. तर मुंबईचा सलग दुसरा पराभव आहे.

आयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने संघाने हा सामना 31 धावांनी जिंकला असून यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. हैदराबादच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने कडवी झुंज दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 277-3 धावा केल्या होत्या. पलटणला या आव्हानाचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 246-5 धावा करता आल्या. तिलक वर्मा याने सर्वाधिक 64 धावांची तुफानी खेळी केली. या सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रचला गेला आहे.
मुंबई इंडियन्सचा डाव
डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठालाग करण्यासाठी मुंबईकडून रोहित आणि इशान मैदानात उतरले होते. दोघांनीही दणका सुरूवात केली होती. रोहितनेही सुरूवात केली पण खासकरून इशान किशन याने गोलंदाजांना रिमांडमध्ये घेतलं होतं. पहिल्या तीन ओव्हरमध्येच मुंबईने 50 धावांचा पल्ला पार केला होता. दोघांनीही एक चांगली सुरूवात करून दिली होती. इशान किशन मोठा फटका मारण्याच्या नादात 34 धावांवर आऊट झाला. त्यापाठोपाठ रोहितही 26 धावा काढून परतला. मोठे खेळाडू गेल्यावर युवा तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी आक्रमण सुरू ठेवलं होतं.
दोघांनीही स्कोर व्यवस्थित ठेवला होता त्यामुळे हैदराबादचे खेळाडूही दबावात दिसत होते. तिलक वर्माने अवघ्या 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं होतं. नमन धीर 30 धावांवर आऊट झाल्यावर पंड्या आला खरा पण त्याने हवी अशी काही कामगिरी केली नाही. मात्र तिलक वर्मा याने आपला दांडपट्टा सुरू ठेवला होता. तिलकने 34 चेंडूत 64 धावा केल्या यामध्ये 6 सिक्स आणि 2 चौकार मारले. पण कमिन्सच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला.
WHAT. A. MATCH! 🔥
Raining sixes and 500 runs scored for the first time ever in #TATAIPL 💥
Hyderabad is treated with an epic encounter 🧡💙👏
Scorecard ▶️ https://t.co/oi6mgyCP5s#SRHvMI pic.twitter.com/hwvWIDGsLh
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
तिलक वर्मा आऊट झाल्यावर धावगतीला ब्रेक लागल्यासारखा झाला. टिम डेव्हिडने मोठे फटके खेळले पण तो संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही. कमिन्स, उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली.
हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने नाबाद 80 धावांची खेळी केली. 34 चेंडूंचा सामना करताना त्याने 7 षटकार आणि 4 चौकार लगावले. मार्करामने नाबाद 42 धावा केल्या. अभिषेक शर्माने 63 आणि ट्रॅव्हिस हेडने 62 धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (WK), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (WK), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट
