IPL 2025 Final : आरसीबी-पंजाबने पहिल्या षटकातच मोडला चेन्नई सुपर किंग्सचा विक्रम, काय केलं वाचा
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विक्रमांची पंगत बसली आहे. या सामन्यात पंजाब किंग्स आणि आरसीबीने पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्सचा मोठा विक्रम मोडला आहे. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने हा विक्रम नोंदवला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सचा विक्रम मोडीत काढला आहे. या दोघांनी हा कारनामा पहिल्या षटकात केला आहे. दोन्ही संघांनी पहिल्या षटकात 13 धावांची खेळी केली. पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी आल्यानंतर विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट ही जोडी मैदानात उतरली होती. फिलिप सॉल्टने स्ट्राईक घेतली होती. तर पहिलं षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग आला होता. या षटकाचा पहिलाच चेंडू वाइड टाकला. त्यानंतर अर्शदीप सिंगने सलग दोन चेंडू निर्धाव टाकले. तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर दोन धावा आल्या. पाचव्या चेंडूवर चौकार आला आणि सहावा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलं. आरसीबीने पहिल्या षटकात एकही विकेट न गमवता 13 धावा काढल्या. या 13 धावांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आरसीबीने पाचवेळा जेतेपद जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा विक्रम मोडीत काढला.
पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 191 धावांचं लक्ष दिलं होतं. प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या ही जोडी मैदानात आली आणि त्यांनी पहिल्या षटकात 13 धावा केल्या. यासह पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल अंतिम फेरीच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारा संघ ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्सने 2023 आयपीएल अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पहिल्या षटकात 10 धावा केल्या होत्या. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा विक्रम आता आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने 2014 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध एक विकेट गमवून 10 धावा केल्या होत्या. आता आरसीबी आणि पंजाबच्या नावावर हा विक्रम रचला गेला आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच एकही जेतेपद न जिंकलेले संघ आले आहेत. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आरसीबीने 9 वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर पंजाब किंग्सने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापू्र्वी 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तेव्हा पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता 11 वर्षानंतर अंतिम फेरीत जागा मिळवली आहे.
