Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची क्वालिफायर 2 मधील आकडेवारी, जाणून घ्या
Mumbai Indians vs Punjab Kings Qualifier 2 IPL 2025 : मुंबई इंडियन्सने शुक्रवारी 30 मे रोजी मुल्लानपूरमध्ये झालेल्या एलिमिनेटरध्ये गुजरातचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली. मुंबईसमोर क्वालिफायर 2 मध्ये पंजाबचं आव्हान असणार आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमातील क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश मिळवलाय. मुंबईने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवून ही कामगिरी केली. मुंबईसमोर आता अंतिम फेरीत पोहचण्यासाठी क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. क्वालिफायर-2 मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. विजयी संघ अंतिम फेरीत आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध 2 हात करणार आहे. मात्र त्याआधी मुंबई इंडियन्सची आतापर्यंत क्वालिफायर-2 मधील कामगिरी कशी राहिली आहे? हे आकड्यांद्वारे जाणून घेऊयात.
मुंबईची क्वालिफायर-2 मधील कामगिरी
आयपीएल स्पर्धेत 2011 पासून प्लेऑफ सामन्यांना सुरुवात झाली. तेव्हापासून मुंबई इंडियन्स आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 4 वेळा क्वालिफायर-2 सामने खेळली आहे. मुंबईने त्यापैकी 2 वेळा विजय मिळवला आहे. अर्थात मुंबई 2 वेळा क्वालिफायर-2 खेळल्यानंतर अंतिम फेरीत पोहचलीय. तर 2 वेळा पराभव झालाय. विशेष म्हणजे मुंबईने क्वालिफायर-2 मध्ये विजय मिळवल्यानंतर फायनलमध्येही दोन्ही वेळा विजय मिळवलाय.
मुंबईने 2011 साली पहिल्यांदा क्वालिफायर-2 मॅच खेळली होती. तेव्हा मुंबईला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुंबईने 2013 साली क्वालिफायर-2 मध्ये राजस्थान रॉयल्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर मुंबईने त्या हंगामात चेन्नईवर 23 धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली होती.
मुंबईने 2017 साली क्वालिफायर-2 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली होती. मुंबईने त्यानंतर अंतिम फेरीत रायजिंग पुणे सुपर जायंट्सवर 1 रन्सने सनसनाटी विजय मिळवत आयपीएल ट्रॉफी उंचावली होती.
तसेच मुंबई इंडियन्सने शेवटच्या वेळेस 2023 साली क्वालिफायर-2 सामना खेळला होता. तेव्हा मुंबईसमोर गुजरात टायटन्सचं आव्हान होतं. मात्र या सामन्यात गुजरात टायटन्स मुंबईवर वरचढ ठरली. गुजरातने मुंबईवर क्वालिफायर-2 मध्ये 62 धावांच्या मोठ्या फरकाने मात करत फायनलचं तिकीट मिळवलं होतं.
मुंबईची पाचवी वेळ
दरम्यान मुंबईची यंदाची क्वालिफायर-2 खेळण्याची यंदाची ही पाचवी वेळ ठरणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात पंजाब किंग्स टीमचं आव्हान आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 26 मे रोजी आमनेसामने आले होते. दोन्ही संघांचा तो साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. त्या सामन्यात पंजाबने मुंबईवर मात केली होती. त्यामुळे आता मुंबई पंजाबवर मात करण्यासह क्वालिफायर-2 जिंकून तिसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यात यशस्वी ठरते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
