IPL 2025 : पंजाब किंग्सची टॉप 2 मध्ये धडक, मुंबईचा 7 विकेट्सने धुव्वा, जोश इंग्लिस-प्रियांश आर्या चमकले
Punjab Kings vs Mumbai Indians Match Result IPL 2025 : पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाबने मुंबईचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत टॉप 2 मध्ये रुबाबात प्रवेश मिळवला आहे.

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 7 विकेट्सने मात करत टॉप 2 मध्ये धडक दिली आहे. पंजाबने या विजयासह क्वालिफायर 1 चं तिकीट मिळवलं आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 9 बॉल राखून पूर्ण केलं. पंजाबने मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला. पंजाबने 18.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. पंजाबने या विजयासह साखळी फेरीतील शेवट विजयाने केला. तर मुंबईने टॉप 2 मध्ये पोहचण्याची संधी गमावली. त्यामुळे आता मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 सामने जिंकावे लागतील. तर पंजाबला या विजयामुळे अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 वेळा संधी मिळेल.
पंजाबचा विजय, मुंबईचा धुव्वा
पंजाबच्या 5 फलंदाजांनीच विजयी आव्हान पूर्ण केलं. प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या या दोघांनी 34 धावांची सलामी भागीदारी केली. प्रभसिमरन सिंह 13 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर प्रियांश आणि जोश इंग्लिस या जोडीने पंजाबच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची शतकी भागीदारी केली. प्रियांश आर्या याने 35 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 9 फोरसह 62 रन्स केल्या. प्रियांशने 177 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली.
प्रियांश आऊट झाल्यानंतर कॅप्टन श्रेयस मैदानात आला. श्रेयसने जोश इंग्लिससह तिसऱ्या विकेटसाठी 28 धावा जोडल्या. त्यानंतर जोश इंग्लिस आऊट झाला. जोशने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या. जोशने 42 बॉलमध्ये 173.81 च्या स्ट्राईक रेटने 73 रन्स केल्या. जोशच्या या खेळीत 3 सिक्स आणि 9 फोरचा समावेश होता. मात्र जोशच्या या खेळीसह पंजाबचा विजय सोपा झाला. पंजाबच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी होती. तेव्हा श्रेयसने फटकेबाजी करुन पंजाबला विजय मिळवून दिला. श्रेयसने 16 बॉलमध्ये नॉट आऊट 26 रन्स केल्या. तर नेहल वढेरा 2 धावांवर नाबाद परतला. मुंबईकडून मिचेल सँटनर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट मिळवली.
पंजाब फायनलपासून एक पाऊल दूर
Sealing a Q1 spot in style 🤌
Captain Shreyas Iyer adds the finishing flair as #PBKS defeat #MI in Jaipur ❤
Scorecard ▶ https://t.co/Dsw52HOtga#TATAIPL | #PBKSvMI | @PunjabKingsIPL pic.twitter.com/x93pqi4hxn
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2025
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी पंजाबने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 184 रन्स केल्या. सूर्यकुमारने 39 बॉलमध्ये सर्वाधिक 57 रन्स केल्या. तर चौघांनी 20 पेक्षा अधिक धावांचं योगदान दिलं. मात्र सूर्यकुमार व्यतिरिक्त मुंबईसाठी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. परिणामी पंजाब मुंबईला 200 धावांच्या आत रोखण्यात यशस्वी ठरली.
