पंजाब किंग्स आणि आरसीबी सामन्याचा निकाल 36 चेंडूतच लागणार! कसं आणि का ते समजून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 फेरीचा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरी गाठणार आहे. या सामन्याचा निकाल फक्त 36 चेंडूत लागणार आहे. चल जाणून घेऊयात नेमकं असं का आणि कसं काय?

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पहिला स्पर्धक गुरुवारी ठरणार आहे. 29 मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. मुल्लांपूर येथे होणाऱ्या सामन्याचा निकाल फक्त 36 चेंडूत लागणार आहे. आता 20 षटकांचा खेळ असताना36 चेंडूतच निकाल कसा लागेल? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. खरं तर 36 चेंडू हे दोन्ही संघांची ताकद आहे आणि या 36 चेंडूवरच आतापर्यंत या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 चा सामना 20-20 षटकांचा होणार यात काही शंका नाही. पण या 20 षटकातील कोणते 36 चेंडू निर्णय ठरवतील? तर हे 36 चेंडू पॉवरप्लेचे आहेत. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची ताकद आहेत.
पॉवर प्लेमधील पहिली सहा षटकांचा आकलन केलं तर यात पंजाब किंग्सच्या फलंदाजीची ताकद दिसून आली आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची ताकद ही गोलंदाजीची आहे. क्वालिफायर 1 मधील पॉवरप्ले दरम्यान पंजाब किंग्सची फलंदाजी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची गोलंदाजी निर्णायक भूमिका बजावताना दिसेल. पंजाब किंग्सने पॉवरप्लेच्या सहा षटकात प्रति षटकं 10.02 धावा केल्या आहेत. इतर संघांच्या तुलनेत ही सरासरी अधिक आहे. तर आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये विरोधी फलंदाजांना रोखलं आहे. पॉवर प्लेच्या षटकात आरसीबीचा इकोनॉमी रेट हा 8.79 आहे. तर याच टप्प्यात सर्वाधिक डॉट बॉल टाकले आहेत. याची टक्केवारी 43.5 इतकी आहे.
पावसामुळे सामना रद्द झाला तर…
आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. त्यामुळे हा सामना काही कारणास्तव रद्द झाला तर पंजाब किंग्सला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. आरसीबीला क्वॉलिफायर फेरीत मुंबई किंवा गुजरात टायटन्सशी खेळावं लागेल. जर हा सामना रद्द झाला नाही तर दोन्ही संघ विजयासाठी जीवाची बाजी लावतील. कारण मागच्या 17 पर्वात दोन्ही संघांची जेतेपदाची झोळी रिती आहे. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्याचा मानस या दोन्ही संघांचा असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2009, 2011, 2016 रोजी अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. या तिन्ही वेळेस पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर पंजाब किंग्सने 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र तेव्हा कोलकात्याने पराभवाचं पाणी पाजलं आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.
