IPL 2025 : पावसामुळे आरसीबी लखनौ सुपर जायंट्स रद्द झाला तर काय? टॉप 2 गणित कसं असेल? जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय? टॉप 2 संघांचं गणित कसं सुटेल ते जाणून घ्या.

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफमध्ये पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स हे संघ पोहोचले आहे. आता चुरस ही टॉप 2 स्थानांसाठी आहे. त्यात पंजाब किंग्सने जागा पक्की केली आहे, तर मुंबई इंडियन्स या टॉप 2 च्या शर्यतीतून आऊट झाला आहे. त्यामुळे टॉप 2 च्या एका जागेसाठी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स हा साखळी फेरीतील शेवटचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला तर गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवेल यात काही शंका नाही. पण पराभव झाला तर तिसऱ्या स्थानावरच राहावं लागेल आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. दरम्यान, या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर टॉप 2 चं गणित कसं सुटणार असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे.
आरसीबी विरुद्ध एलएसजी सामना रद्द झाला तर?
भारतात वेळेआधीच मान्सूनचं आगमन झालं आहे. देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे लखनौ च्या इकाना स्टेडियममध्येही पाऊस पडेल की काय अशी शंका क्रीडाप्रेमींना सतावत आहे. जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. पण यामुळे आरसीबीला फटका बसेल आणि गुजरात टायटन्सला फायदा होईल. कारण आरसीबीला 1 गुण मिळेल पण नेट रनरेटमध्ये काहीच बदल होणार नाही. त्यामुळे गुजरात टायटन्सला फायदा होईल. गुजरात टायटन्स टॉप 2 मध्ये राहील आणि पंजाब किंग्स विरुद्ध क्वॉलिफायर 1 चा सामना खेळेल. तर आरसीबीला मुंबई इंडियन्सविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.
आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एलिमिनेटर सामन्यात खेळावे लागेल. त्यामुळे, लखनौ सुपरजायंट्स विरुद्धचा सामना आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध जिंकून पहिल्या क्वालिफायरसाठी पात्र ठरेल का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. आरसीबीकडे 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा जेतेपदाची संधी आहे.
