…तर देशात एका मिनिटात दंगे; बांगलादेशी खेळाडूंना विरोध, मौलाना साजिद रशिदी यांचा सुटला तोल
IPL Bangladesh Player Controversy: शाहरुख खानची आयपीएल टीम केकेआर सध्या वादात सापडली आहे. बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमान याच्यावरुन सध्या वाद पेटला आहे. अनेक जण बांगलादेशी खेळाडूंना विरोध करत आहेत. मुस्लिम नेत्यांनी सुद्धा या खेळाडूंना विरोध सुरू केला आहे. या वादात आता साजिद रशिदी यांनी उडी घेतली आहे.

Sajid Rashidi on Mustafizur Rahman: शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने(KKR) लिलावात बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमान याला खरेदी केले आहे. पण त्यावरून देशभरात वादळ उठलं आहे. सत्तांतरानंतर बांगलादेशातील काळजीवाहू सरकार भारतविरोधी कारवायात गुंतलेले आहे. तर कट्टरपंथी भारताविरोधात कारस्थान करत आहेत. त्यावरून रहमान याला खेळू देऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे. केवळ हिंदुत्ववादीच नाही तर मुस्लिम नेत्यांनी सुद्धा बांगलादेशातील खेळाडूंना खेळू न देण्याची मागणी करत आहेत. आता या वादात साजिद रशिदी यांनी उडी घेतली आहे. त्यांच्या वक्तव्याने मोठा वाद उफळला आहे.
तर एका मिनिटात देशात दंगे
साजिद रशिदी यांनी बांगलादेशातील खेळाडूंना भारतात खेळू न देण्याच्या वादात उडी घेतली आहे. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या विरोधावर प्रतिक्रिया देताना त्यांनी वेगळाच सूर आळवला. जर मुसलमानांनी सहन केले नाही तर एका मिनिटात देशात दंगे होतील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यावरून वाद पेटला आहे.
बांगलादेशी खेळाडूंना धर्मामुळे विरोध
मौलाना साजिद रशिदी म्हणाले की बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिजुर रहमान आणि त्याला खरेदी करणारा शाहरुख खान हे दोघेही मुसलमान आहेत. त्यामुळे या दोघांना विरोध करण्यात येत आहे. हा मुसलमानाविरोधातील द्वेष आहे आणि इस्लामोफोबिया आहे. मुस्लिमांचे नाव येताच विरोध करणे अत्यंत सोपे होते. देशात उठसूठ कोणीही विरोध करत आहे. ज्यांनी संविधान, घटना वाचली नाही, ते लोक आता विरोध करत आहेत. मुस्लिमांचे नाव जिथे येते, तिथे विरोध करणे एकदम सोप्पं होतं. खेळाडू जर मुस्लिम असेल तर मग विरोध होणारच असे मत त्यांनी व्यक्त केले.
हा क्रिकेट संघ शाहरूख खान याचा संघ आहे. त्याने कुणाला संघात घ्यावे, कुणाला खेळवावे, हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं, जर घटनेच्या काही विरोधात असेल तर ते सरकार बघेल. विरोध करणारे तुम्ही कोण आहात, तुम्ही काय म्हणून विरोध करत आहात, असा सवालही रशिदी यांनी केला. तर दुसरीकडे काही मुस्लिम नेत्यांनी मौलाना रशिदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. रशिदी यांना बांगलादेशी खेळाडूंचा इतका पुळका कशामुळे आला, ते दंगेधोप्याची भाषा कशाला करत आहेत, असा सवाल मुस्लिम स्कॉलर्सनी त्यांना विचारला आहे.
