हेल्मेटवर पॅलेस्टाईनचा झेंडा, हा भारतीय खेळाडू मैदानात उतरला;आता सुरक्षा यंत्रणांचा मागे लागला ससेमिरा
Palestinian flag on helmet : या खेळाडू मैदानावर उतरताच एकच चर्चा सुरू झाली. सामन्यात खेळताना त्याच्या हेल्मेटने अनेकांचे लक्ष वेधले. कारण या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो अथवा भारतीय तिरंगा नव्हता तर पॅलेस्टाईनचा ध्वज होता. आता त्याच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. कोण आहे हा खेळाडू?

Jammu and Kashmir Cricket Association Player Furqan Bhat:जम्मू आणि काश्मीरमधील एका स्थानिक सामन्यात खेळाडूच्या हेल्मेटवर बीसीसीआय लोगो अथवा भारतीय तिरंगा नव्हता. तर त्याच्या हेल्मेटवर पॅलेस्टाईनचा ध्वज होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याच्या या कृतीने क्रिकेट जगतात वादाला फोडणी बसली. फुरकान भट असे या खेळाडुचे नाव आहे. तो जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगमध्ये खेळत होता. त्यावेळी त्याने हेल्मेटवर वेगळ्याच देशाचा झेंडा लावल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. भट काल जम्मू ट्रेलब्लेजर्स विरोधात JK11 या संघाकडून खेळला. हे प्रकरण आता त्याच्यावर शेकण्याची शक्यता आहे. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला या कृतीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आता सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा त्याच्या पाठीमागे लागला आहे. जम्मू ग्रामीण पोलिसांनी त्याला चौकशीसाठी पाचरण केले आहे.
आयोजकाची पण चौकशी होणार
ही लीग आयोजीत करणारे आयोजक जाहिद भट आणि हे मैदान उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीचीही आता चौकशी करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर हे सामने खेळण्यासाठी कुणी खर्च केला, कुणी पैसा दिला, स्पॉन्सर कोण, याचीही चौकशी होणार आहे. सुरक्षा यंत्रणा या कृतीमुळे अलर्ट झाल्या आहेत. इस्त्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध विराम झाला आहे. त्यालाही आता एक महिना उलटला आहे. स्वतंत्र पॅलेस्टाईनची घोषणा करून नागरी हक्का अबाधित ठेवावे अशी मागणी जगभरातून करण्यात येत असतानाच संवेदनशील जम्मू आणि काश्मीरमध्ये हा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहेत.
जम्मू आणि काश्मीर असोसिएशनची मान्यता नाही
जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनची (JKCA) भूमिका पण समोर आली आहे. त्यानुसार, हे स्थानिक सामने होते. तिथे आयोजित टुर्नामेंटमध्ये या खेळाडूच्या हेल्मेटवर पॅलेस्टाईनचा ध्वज होता. पण या टुर्नामेंटला असोसिएशनची मान्यता नाही. हा सामना वर्षाअखेर 29 डिसेंबर रोजी खेळण्यात आला. जम्मू आणि काश्मीर चॅम्पियन्स लीगमध्ये फुरकान भट आणि आयोजक जाहिद भट यांची पोलीस चौकशी सुरू आहे. हा खेळाडू आणि आयोजक हे असोसिएशनशी संबंधित नसल्याचे आता समोर आले आहे.
माहिती मिळताच पोलीस मैदानावर
फुरकान भट हा डोक्यावर पॅलेस्टाईन ध्वज असलेला हेल्मेट घालून उतरल्याची माहिती मिळताच पोलीस मैदानावर धडकले. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली. यापूर्वी इंडियन हेवन प्रीमियर लीग सुद्धा दुसऱ्या एका वादात अडकली होती. आयोजकांनी सामने आयोजित करून अचानकच ते रद्द करत श्रीनगरला पळ काढला होता. त्यावरून मोठा वाद उफळला होता. या लीगमध्ये बडे खेळाडू खेळणार असल्याचा दावा करण्यात आला होता.
