Team India: जय महाकाल! विश्व विजेता खेळाडू बाबाच्या दरबारात; नवीन वर्षात टीम इंडियाने घेतला आशीर्वाद
Ujjain Mahakal Temple: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या दिग्गज खेळाडूंनी आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात हजेरी लावली. भस्म आरतीत त्यांनी सहभाग घेतला. वनडे विश्वकप जिंकल्यानंतर महिला संघाने श्रीलंकेला लोळावले आहे. तर आता 2026 मधील टी20 विश्व कपासाठी त्या घाम गाळणार आहेत.

Women Team India Players: भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूने नवीन वर्षाची सुरुवात बाबा महाकालच्या दरबारातून केली. उज्जैन येथील जगप्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात त्यांनी डोके टेकवले. स्मृती मानधना,शेफाली वर्मा, रेणुका सिंह ठाकुर, स्नेह राणा, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांनी सकाळच्या विशेष भस्म आरतीत सहभाग घेतला. खेळाडूंनी भगवान महाकालची पूजा-अर्चना केली. पुजाऱ्यांकडून आशीर्वाद पण घेतले. नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभदायक, फलदायक ठरावी अशी प्रार्थना त्यांनी केली. मानसिक शांती आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी बाबा महाकालकडे आशीर्वाद मागितला.
भारतीय महिला संघाचे मनोबल उंच
टीम इंडियाने वर्ष 2025 च्या अखेरीस धमाका केला. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच धावपट्टीवर हरवून टीम इंडिया विश्वविजेता ठरली. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील महिला क्रिकेट संघ विजयाच्या वारूवर चौफेर उधळला आहे. संघाने वेस्टइंडीजला 2-1 आणि इंग्लंडला 3-2 अशी मात दिली. तर श्रीलंकेला टी20 मालिकेत 5-0 अशी क्लीन स्वीप दिली. तिरुअनंतपुरममध्ये खेळताना अखेरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 15 धावांनी विजय मिळवला. तिसऱ्यांदा टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत श्रीलंकेचा सपशेल पराभव केला. भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या सर्वात अश्वासक आणि खतरनाक संघ मानल्या जात आहे.
टी20 विश्वचषकावर सर्वांच्या खिळल्या नजरा
भारतीय संघाने एकदिवशीय सामन्यात चांगलाच दबदबा तयार केला आहे. पण वर्ष 2026 मध्ये महिला क्रिकेट संघासमोर टी20 विश्वचषक जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. वर्ष 2024 मधील टी20 विश्वचषकात भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकाच्या पहिल्याच फेरीतून महिला संघाला बाहेर पडावे लागले होते. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी महिला संघ तयारी करत आहे. त्या तयारीपूर्वी या संघाने बाबा महाकालचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. मानसिक शक्ती घेतली. हा संघ आता पुढील फॉर्म्याटसाठी तयारी करणार आहे. भल्या पहाटे खेळाडूंना पाहून भाविकांनाही आनंद झाला. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. स्मृती मानधना हिच्यासाठी सरते वर्ष कडूगोड अनुभवाचे गेले. तिच्या आयुष्यात एक मोठे वादळ येऊन गेले. पहाटेच्या भस्म आरतीने अनेक जखमा भरण्याची किमया साधली गेली. या सर्वांची गोळाबेरीज येत्या टी 20 विश्वचषकात दिसून येईल. पण वर्षाच्या सुरुवातीला देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या महिला खेळाडूंनी पुढची निर्णायक दिशा ठरवली असल्याचे दिसून येते. त्या नवीन स्वप्न घेऊन दरबारात आल्या. त्यांनी ही स्वप्न पूर्ण होण्यासाठी बाबा महाकालचे आशीर्वाद घेतले.
