Ranji Trophy : जम्मू काश्मीरचा एकच खेळाडू पडला मुंबईवर भारी, शतकी खेळीसह नोंदवला असा विक्रम
रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेचं पर्व सुरु झालं असून पहिल्याच सामन्यात जम्मू काश्मीरने मुंबईला तारे दाखवले. कर्णधार पारस डोगराने मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात मुंबई आणि जम्मू काश्मीर हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल जम्मू काश्मीरच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण मुंबईने पहिल्या डावात 386 धावा केल्या. त्यामुळे जम्मू काश्मीरला या धावा भारी पडतील असा अंदाज होता. पण जम्मू काश्मीरने मुंबईच्या गोलंदाजांना तोडीस तोड उत्तर दिलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जम्मू काश्मीरने 7 गडी गमवून 273 धावा केल्या. जम्मू काश्मीरचा डाव गडगडला असताना कर्णधार पारस डोगराने एका बाजूने लढत दिली. त्याने 169 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा केल्या. खरं तर पारस डोगराचं वय हे 40 वर्षे आहे. पण त्याने मुंबईच्या गोलंदांना जेरीस आणलं. शार्दुल ठाकुर आणि तुषार देशपांडे यासारखे दिग्गज गोलंदाजासमोर त्याने चांगली खेळी केली. त्याने आपल्या फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमधील 32वं शतक ठोकलं. यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला.
पारस डोगराने मुंबई विरुद्ध शतकी खेळी करत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. या यादीत वसीम जाफर पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 40 शतकं ठोकली आहे. तर आता 32 शतकांसह पारस डोगरा दुसऱ्या स्थानावर आहे. अजय शर्माच्या नावावर 31 शतकं आहेत. अमोल मुजूमदार आणि ऋषिकेश कानिटकरने रणजी स्पर्धेत प्रत्येकी 28 शतकं ठोकली आहेत.
40-year-old J&K captain Paras Dogra becomes the second-highest century maker in Ranji Trophy history. 🔥
Most hundreds in Ranji Trophy:
40 – Wasim Jaffer. 32* – Paras Dogra. 31 – Ajay Sharma. 28 – Amol Muzumdar. 28 – Hrishikesh Kanitkar. pic.twitter.com/jmHWdF8Eod
— All Cricket Records (@Cric_records45) October 16, 2025
पारस डोगराची क्रिकेट कारकीर्द
पारस डोगराने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 143 सामने खेळला आहे. त्याने 230 डावात 48.37 च्या सरासरीने 9966 धावा केल्या आहेत. लवकरच 10 हजार धावांचा पल्ला गाठणार आहे. त्याने 32 शतकं आणि 33 अर्धशतकं ठोकली आहेत. लिस्ट ए सामन्यात पारसने 124 सामने खेळला आहे. त्यात 41.52 च्या सरासरीने 3696 धावा केल्या आहेत. यात 6 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20 क्रिकेटमध्ये 27.66 च्या सरासरीने 2324 धावा केल्यात. यात 13 अर्धशतकं आहेत. आयपीएमध्ये पारस डोगरा राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळला आहे. पण टीम इंडियाकडून खेळण्याची काही संधी मिळाली नाही.
