बुमराहचा ‘पंच’, जो रुटचं शतक, दुसऱ्या डावात इंग्लंडची त्रिशतकी मजल, भारताला 121 षटकात 209 धावांचं लक्ष्य

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. आज चौथ्या दिवशी सामना अतिशय मनोरंजक स्थितीत पोहोचला आहे.

बुमराहचा 'पंच', जो रुटचं शतक, दुसऱ्या डावात इंग्लंडची त्रिशतकी मजल, भारताला 121 षटकात 209 धावांचं लक्ष्य

लंडन : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. आज चौथ्या दिवशी सामना अतिशय मनोरंजक स्थितीत पोहोचला आहे. आज इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांमध्ये गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आलं. कर्णधार जो रुटच्या शतकी (109) खेळीच्या जोरावर इंग्लंडने 303 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात भारताला 95 धावांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारताला आता 121 षटकांमध्ये 209 धावा करण्याचं लक्ष्य आहे. तर दुसरीकडे हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला 209 धावांच्या आत भारताचे 10 गडी बाद करावे लागतील. (Jasprit Bumrah takes 5 wickets India need 209 runs to win 1st test against England)

कालच्या बिनबाद 25 धावांवरुन आज इंग्लंडने त्यांच्या डावाला सुरुवात केली. 85.5 षटकात इंग्लंडने 10 फलंदाजांच्या बदल्यात 303 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातही पहिल्या डावाप्रमाणे पडझड पाहायला मिळाली. परंतु कर्णधार जो रुटने मात्र एका बाजूने खिंड लढवली. त्याने सयंमी खेळी करत अनेकदा आक्रमक फटके लगावत 14 चौकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर इग्लंडने 303 धावांपर्यंत मजल मारली. रुटव्यतिरिक्त इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. सॅम करन (32), जॉनी बेअरस्टो (30) आणि डॉम सिब्ले (28) या तिघांनी रुटसोबत महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचत इंग्लंडच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही चांगली गोलंदाजी केली. मात्र त्यांना रुटला लवकर बाद करता आलं नाही. जसप्रीत बुमराहने आज उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्याने पाच विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मोहम्मद शमीने एक विकेट घेतली. जाडेजाच्या या सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही.

संबंधित बातम्या

विराट कोहलीचा धुरंदर, 46 चेंडूत ठोकलं शतक, नंतर दारुच्या नशेत संपवलं करीयर

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच विराट पराभूत, ‘या’ गोष्टी सर्वाधिक पराभवाचा रेकॉर्ड नावावर

(Jasprit Bumrah takes 5 wickets India need 209 runs to win 1st test against England)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI