D K Shivkumar : एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत चाहत्यांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री पोलिसांबाबत म्हणाले…
D K Shivkumar On Chinnaswamy Stadium Rcb Stampede : आरसीबीच्या आनंदोत्सवाला गाळबोट लागलं आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18 व्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला. आरसीबीने ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारवा उरला नाही. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष भारतासह परदेशातही करण्यात आला. आरसीबीच्या विजयानंतर बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल ट्रॉफी विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन हे संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान करण्यात आलं होतं. त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमबाहेर तोबा गर्दी केली होती. मात्र ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत दुर्देवाने 10 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणानंतर आता कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने हा प्रकार घडल्याचं डी के शिवकुमार म्हणाले. तर या दुर्घटनेनंतर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले आहेत.
कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दुर्घटनेबाबत जनतेची माफी मागितली. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर आता आरोप केला जात आहे. डी के शिवकुमार काय म्हणाले? तर भाजपकडून सत्ताधाऱ्यांवर नक्की काय आरोप करण्यात आलाय? हे जाणून घेऊयात.
डी के शिवकुमार काय म्हणाले?
“आरसीबीच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. मी पोलिसांना दोष देणार नाही. 5 हजार पोलीस तैनात होते. या दुर्घटनेत पोलिसांचा दोष नाही. घडलेल्या दुर्घटनेबद्दल आम्ही माफी मागतो”, असं म्हणत डी के शिवकुमार यांनी जनतेची माफी मागतिली.
भाजपकडून आरोप काय?
या सर्व प्रकाराला काँग्रेस जबाबदार आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे हा सर्व प्रकार घडला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेवरुन राजकारण रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू
दरम्यान या चेंगराचेंगरीत 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 पेक्षा अधिक चाहते जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
