LLC Auction 2024: लीजेंड्स लीगसाठी लागली लाखोंची बोली! ब्रेट ली, मार्टिन गप्टिल Unsold
गेल्या काही वर्षात क्रिकेटचं स्वरूप बदललं आहे. झटपट फॉर्मेटमुळे लीग स्पर्धा वाढल्या आहेत. त्यामुळे क्रीडारसिकांना क्रिकेटची मेजवानी मिळत आहे. असं असताना लीजेंड्स लीग क्रिकेटच्या माध्यमातून दिग्गज खेळाडूंना मैदानात पाहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी खेळाडूंची बोली लागली. चला जाणून घेऊयात कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळाली ते

लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेचा थरार क्रीडारसिकांना अनुभवता येणार आहे. स्पर्धेचं हे तिसरं पर्व असणार आहे. आतापर्यंत मैदान गाजवलेल्या खेळाडूंना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. निवृत्त झालेल्या खेळाडूंचं वय आणि अनुभव पाहता क्रीडारसिकांना एक वेगळीच अनुभूती मिळणार यात शंका नाही. ही लीग श्रीनगर, जोधपूर आणि सूरत येथे होणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेपूर्वी दिल्लीत खेळाडूंसाठी लिलाव पार पडला. यात खेळाडूंवर लाखो रुपयांची बोली लागली. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू इसुरु उडाना याच्यासाठी सर्वाधिक रक्कम मोजण्यात आली आहे. अर्बनाइजर्स हैदराबाद या संघाने त्यासाठी ही रक्कम मोजली. दुसरीकडे, ब्रेट ली आणि मार्टिन गप्टीलसारखे दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. तर शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांना लॉटरी लागली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच लीजेंड्स लीग स्पर्धेत कर्णधारपद मिळालं आहे. दिनेश कार्तिक साउदर्न सुपरस्टार संघाचा कर्णधार झाला आहे. त्याला किती रक्कम मिळाली हे अस्पष्ट आहे. तर धवनवर अजून बोली लागलेली नाही.
लिलावात श्रीलंकेच्या इसुरु उडाना याच्यासाठी अर्बनायजर्स हैदराबादने 61.9 लाखांची बोली लावली. तर वेस्ट इंडिजचा चॅडविक वॉल्टन हा दुसरा महागडा खेळाडू ठरला. 60.3 लाख रुपये मोजून हैदराबादने त्याला विकत घेतलं. दुसरीकडे मणिपाल टायगर्सने ऑस्ट्रेलियाच्या डॅन ख्रिस्टियनला 56.95 लाख रुपये देत संघात घेतलं आहे. दुसरीकडे, रॉस टेलर आणि धवल कुलकर्णी यांनाही मोठी रक्कम मिळाली. दोघांसाठी 50-50 लाखांची बोली लागली. टेलरला कोणार्क सूर्या संघाने, तर धवलला इंडिया कॅपिटल्स संघाने खरेदी केलं. नुकतंच वेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या शॅनन गॅब्रायलला गुजरातने साईन केलं आहे. त्याच्यासाठी 17.08 लाख रुपये मोजले.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बोलबाला असलेल्या खेळाडूंना मात्र काहीच किंमत मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने एकेकाळी मैदान गाजवलं आहे. मात्र लीजेंड्स लीग स्पर्धेत त्याला खरेदीदार मिळाला नाही. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाचा टी20 वर्ल्डकप विजयी संघाचा कर्णधार एरॉन फिंचला खरेदी करण्यास कोणी रस दाखवला नाही. न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील आणि भारताचा प्रवीण कुमार, आरपी सिंह अनसोल्ड राहिले. लिलावात या पाच खेळाडूंव्यतिरिक्त 56 खेळाडूंना कोणीच भाव दिला नाही.
