MPCA अध्यक्षपदी बिनविरोध निवडीनंतर महानआर्यमन सिंधिया यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली, म्हणाले…
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणुकीत महानआर्यमन सिंधिया यांची बिनविरोध निवड झाली. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनची सूत्र आता महानआर्यमनच्या हाती असतील. यापूर्वी आजोबा माधवराव सिंधिया आणि वडील ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एपीसीएचं अध्यक्षपद भूषवलं आहे. यावेळी महानआर्यमन यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली.

महानआर्यमन सिंधिया यांच्या हाती मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनची सूत्र आली आहेत. माजी अध्यक्ष अभिलाख खांडेकर यांच्या हातून त्यांनी सूत्र स्विकारली. यावेळी महानआर्यमन सिंधिया यांचे वडील ज्योतिरादित्य सिंधियाही उपस्थित होते. 29 वर्षीय महानआर्यमनने या पदासाठी अर्ज दाखल केला, तेव्हाच त्यांची निवड निश्चित झाली होती. कारण त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांनी निवड बिनविरोध झाली. यासह त्यांना सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान देखील मिळाला आहे. महानआयर्मन मध्य प्रदेश लीगचे अध्यक्ष आहेत. तसेच ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षदेखील आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होणारी सिंधिया कुटुंबातील ही तिसरी पिढी आहे. यापूर्वी महानआर्यमन यांचे आजोबा माधवराव सिंधिया आणि वडील ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही काळ हे पद भूषवलं आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित महानआर्यमन सिंधिया यांनी सांगितलं की, “मागील सर्व अध्यक्षांनी प्रचंड काम केले आहे आणि मी आमच्या संघटनेला देशातील नंबर वन बनवण्यासाठी तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. बिनविरोध निवडून येणे हे दर्शवते की संघटना एक कुटुंब आहे जे कोणत्याही निर्णयात नेहमीच एकजूट राहते.’ असं सांगताना क्रिकेट गावखेड्यापर्यंत घेऊन जाऊ असा निर्धारही व्यक्त केला. इतकंच काय तर महिला क्रिकेटसाठीही संधी निर्माण करू, असं देखील त्यांनी सांगितलं. ‘मी दरवर्षी इंदूरमध्ये काहीतरी नवीन घेऊन येईन, ज्याची सुरुवात येथे होणाऱ्या महिला विश्वचषकापासून होईल. इंदूरमधील आयपीएल सामन्यांबद्दल, मी सध्या काहीही सांगू शकत नाही.’, असंही ते पुढे म्हणाले.
VIDEO | Indore: Mahanaryaman Scindia, son of Union Minister Jyotiraditya Scindia, elected unopposed as the youngest president of the Madhya Pradesh Cricket Association, says, “All the past presidents have done tremendous work, and I will try to take that legacy forward to make… pic.twitter.com/rWXOGG5wID
— Press Trust of India (@PTI_News) September 2, 2025
महानआर्यमन सिंधिया ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वारस आहेत. त्यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1995 रोजी झाला. ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियदर्शिनी राजे सिंधिया यांचे एकुलते एक पुत्र आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे देहारादूनच्या दून शाळेत घेतले. त्यानंतर येल विद्यापीठातून पुढचं शिक्षण घेतलं. तसेच अमेरिकेतून एमबीएची डिग्री प्राप्त केली. महानआर्यमन ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेसमध्ये राहतात. त्याची अंदाजित किंमत 4 हजार कोटी रुपये आहे. महानआर्यमन सिंधिया यांना क्रिकेटशिवाय संगीताचीही आवड आहे.
