
रविवारी 20 एप्रिलला आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 38 वा सामना हा खास असणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं तर महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांचा हा या मोसमातील आठवा सामना असणार आहेत. तसेच दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ ठरणार आहे. चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबईला पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबईकडे आता आपल्या होम ग्राउंडमध्ये चेन्नईचा धुव्वा उडवत पहिल्या पराभवाची वचपा काढण्याची संधी आहे.
चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांनी या हंगामाची सुरुवात एकमेकांविरुद्ध केली होती. उभयसंघात 23 मार्चला हा सामना झाला होता. तेव्हा चेन्नईने मुंबईवर 4 विकेट्सने मात केली होती. मुंबईने विजयासाठी दिलेलं 156 धावांचं आव्हान चेन्नईने 5 चेंडू राखून आणि 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. चेन्नईने अशाप्रकारे हंगामाची विजयाने सुरुवात केली होती. त्यामुळे मुंबईचा रविवार 20 एप्रिलला या पराभवाच वचपा घेत हिशोब बरोबर करण्याचा प्रयत्न असणार आहे.
मुंबईने या मोसमातील गेल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिट्ल्सनंतर सनरायजर्स हैदराबादवर मात करत सलग 2 विजय मिळवले आहेत. त्यामुळे पलटणकडे चेन्नईला पराभूत करुन सलग तिसरा आणि एकूण चौथा विजय मिळवण्याची संधी आहे.
दरम्यान चेन्नईची पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात वाईट स्थिती आहे. चेन्नई या पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या अर्थात दहाव्या स्थानी आहे. चेन्नईने खेळलेल्या 7 पैकी फक्त 2 सामन्यांत विजयी होता आलं आहे. चेन्नईचा नेट रनरेट हा -1.276 असा आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुंबईने चेन्नईच्या तुलनेत फक्त 1 सामनाच जास्त जिंकला आहे. मुंबईने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 4 वेळा पराभूत झाली आहे. मुंबईचा पहिल्या आणि सलग 2 सामन्यांमध्ये पराभव झाला. त्यानंतर मुंबईने तिसऱ्या आणि घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममधील पहिल्या सामन्यात केकेआरचा पराभव करत विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर पलटणला सलग 2 वेळा पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर दणक्यात कमबॅक करत सलग 2 सामने जिंकले. त्यामुळे मुंबईचा नेट रनरेट हा 3 विजयांसह +0.239 असा आहे.
दरम्यान फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 17 वर्षीय आयुष म्हात्रे याला सीएसकेने ऋतुराज गायकवाडच्या जागी संधी दिली आहे. आता आयुषला घरच्या मैदानात मुंबईविरुद्ध पदार्पणाची संधी मिळणार का? यासाठी चाहत्यांना टॉसपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.