IND vs ENG : तर विराट कोहली कसोटी निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, माजी कर्णधाराचा दावा
Virat Kohli Test Cricket Retirement : विराट कोहली याने 12 मे रोजी सोशल मीडियावरुन पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. मात्र विराट हा निर्णय बदलू शकतो, असा दावा माजी कर्णधाराने केला आहे.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने अवघ्या काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. विराटने एकाएकी निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा झटका लागला. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने मोठा दावा केला आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो, असं क्लार्कने म्हटलं आहे. मात्र विराट असं फक्त एकाच स्थितीत करु शकतो, असंही क्लार्कने म्हटलं. आता क्लार्कने विराटबाबत नक्की काय म्हटलंय? हे सविस्तर जाणून घेऊयात.
मायकल क्लार्क काय म्हणाला?
टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका 0-5 अशा एकतर्फी फरकाने गमावली तर विराट निवृत्तीचा निर्णय बदलू शकतो. विराट टेस्ट क्रिकेटवर फार प्रेम करतो. तसेच विराटचं कसोटी क्रिकेटप्रती असलेलं समर्पण हे अद्भुत आहे. तसेच विराट आणि रोहित शर्मा या दोघांशिवायही भारतीय संघ चांगला आहे. या दोघांशिवायही टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध जिंकू शकते, असंही क्लार्कने म्हटलं.
विराट आणि रोहितची निवृत्ती
कर्णधार रोहित आणि विराट या दोघांनी अवघ्या काही दिवसांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. विराट आणि रोहित या दोघांनी गेल्या दशकापासून कसोटी क्रिकेटमध्ये योगदान दिलं. दोघेही कसोटी संघाचे प्रमुख खेळाडू होते. तसेच विराट आणि रोहित दोघांनीही वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2024 साली टी 20I क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता विराट आणि रोहित दोघेही फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत.
विराट आणि रोहितची आकडेवारी
विराटने टीम इंडियाचं 123 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. विराटने 46.85 च्या सरासरीने आणि 55.57 च्या स्ट्राईक रेटने 9 हजार 230 धावा केल्या. विराटने या दरम्यान 30 शतकं आणि 71 अर्धशतकं झळकावली. विराटची नाबाद 254 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर दुसऱ्या बाजूला रोहितने 67 सामन्यांमध्ये 40 पेक्षा अधिकच्या सरासरीने 4 हजार 301 धावा केल्या. रोहितने टेस्टमध्ये 12 शतकं आणि 18 अर्धशतकं झळकावली. रोहितचा टेस्टमधील 212 हा बेस्ट स्कोअर होता.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
दरम्यान टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान 5 कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही संघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिली मालिका असणार आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
