Retirement : वर्ल्ड कपमधील भारत-ऑस्ट्रेलिया सामना शेवटचा ठरला, स्टार खेळाडूचा T20i क्रिकेटला अलविदा, कोण आहे तो?
Mitchell Starc T20i Retirement : अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने 65 टी 20i सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर आता स्टार्कने टी 20i क्रिकेटमधून निवृ्त्तीची घोषणा केली आहे.

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने 24 ऑगस्टला सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता आणखी एका स्टार खेळाडूने टी 20i क्रिकेटला अलविदा केला आहे. या खेळाडूने अखेरचा टी 20i सामना हा 14 महिन्यांआधी वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. मात्र आता या खेळाडूने टी 20i क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे या खेळाडूने 24 जून 2024 रोजी खेळलेला त्याच्या कारकीर्दीतील टी 20i सामना हा अखेरचा आणि शेवटचा ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटला रामराम केल्याचं जाहीर केलंय.
ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची टी 20i कारकीर्द 13 वर्षांची राहिली. स्टार्कने या 13 वर्षांमध्ये 65 सामने खेळले. स्टार्कने 2012 साली टी 20i पदार्पण केलं होतं. तर स्टार्कचा टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील भारताविरूद्धचा सामना हा शेवटचा ठरला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी काही तासांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर स्टार्कने निवृत्तीची घोषणा केली. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कच्या निवृत्तीबाबतची माहिती देण्यात आली.
वनडे-टेस्ट क्रिकेटला प्राधान्य
स्टार्कने टी 20i क्रिकेटला अलविदा करण्यामागे काही कारण असल्याचं म्हटलं जात आहे. स्टार्कने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. स्टार्कने आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज
स्टार्कने 2012 साली पाकिस्तान विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. स्टार्कने त्याच्या कारकीर्दीत अनेक सामन्यात ऑस्ट्रेलियाला एकहाती सामने जिंकून दिले. स्टार्कने एकूण 65 सामन्यांमध्ये 79 विकेट्स मिळवल्या. स्टार्क एडम झॅम्पा याच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी टी 20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
टेस्ट आणि वनडे करिअर
दरम्यान स्टार्कने ऑस्ट्रेलियाचं 127 एकदिवसीय आणि 100 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. स्टार्कने कसोटीत एकूण 402 विकेट्स मिळवल्या आहेत. स्टार्कने 16 वेळा 5 आणि 2 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच स्टार्कने वनडेत 244 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.
