शमीनंतर आता मुलगी होळी खेळल्याने वाद! ट्रोलर्सनी हसीन जहाँला बरंच काही ऐकवलं
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु असताना मोहम्मद शमीने एनर्जी ड्रिंक प्यायल्याने वाद झाला होता. असं कसं करू शकतो असा धार्मिक वाद रंगला होता. आता त्याची मुलगी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. मोहम्मद शमीची मुलगी आयराने 14 मार्चला होळी खेळली. तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. त्यांना हसीन जहाँने सडेतोड उत्तर दिलं आहे.

देशभरात धुळीवडीचा सण मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. रंगाच्या आनंदोत्सवात प्रत्येक जण रंगून गेला होता. मात्र या सणालाही धार्मिक वळण लागलं आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मुलीने होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला. होळीचा सण हिंदू धर्मिय साजरा करतात. पण हसीन जहाँने मुस्लिम असूनही मुलीला होळीचा पुरेपूर आनंद लुटू दिला. तिने आपल्या मित्रांसोबत होळीचा आनंद साजरा केला. होळीच्या या सेलिब्रेशनचे फोटो एक्स वाइफ हसीन जहाँने सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. ट्रोलर्सने हसीन जहाँला ट्रोल करण्यास सुरुवात केली. मुस्लिम असूनही रमझान महिन्यात होळी खेळणं गुन्हा असल्याचं सांगितलं. अनेकांनी तर वाईट शब्दात हसीन जहाँला ट्रोल केलं आहे. एका ट्रोलर्सने असं करणं चुकीचं असल्याचं म्हंटलं. तर दुसऱ्या ट्रोलर्सने रमझानचा महिना आहे आणि असं करताना लाज वाटत नाही का? एका ट्रोलर्सने तर मुस्लिम असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दुसरीकडे, काही जणांनी शमीच्या मुलीचं होळी खेळल्याने कौतुक केलं तसेच तिच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
होळीच्या एक दिवस आधी हसीन जहाँने मुलगी आयराचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात शमीची मुलगी होळीच्या गाण्यावर बिंधास्त नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ डान्स क्लासमधला असल्याचं कळत आहे. पण हा व्हिडीओ पाहूनही ट्रोलर्सने निशाणा साधला आहे. त्यांच्या मते रमझानच्या महिन्यात असं करणं गुन्हा आहे. काही जणांनी तर हसीन जहाँने शमीच्या मुलीला वाईट वळणावर ढकलल्याचा आरोप केला. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांची भेट 2012 आयपीएल दरम्यान झाली होती. हसीन केकेआरसाठी चीयरलीडर म्हणून काम करत होती. तेव्हा शमी या संघासाठी खेळत होता. तेव्हा दोघांमध्ये प्रेम झालं आमि 2014 मध्ये निकाह केला. 2015 मध्ये आयराचा जन्म झाला. पण तीन वर्षातच या दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला.
View this post on Instagram
View this post on Instagram
दुसरीकडे, मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान एनर्जी ड्रिंक पितानाचे फोटो व्हायरल झाले होते. यावर काही मौलवींनी नाराजी व्यक्त केली होती. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवीने घणाघाती टीका केली होती. मौलवीच्या मते, रोजा न ठेवल्याने मोहम्मद शमीने मोठा गुन्हा केल्याचं सांगितलं होतं.