टी20 वर्ल्डकपच्या तिसऱ्याच सामन्यात सुपर ओव्हरचा थरार, वाचा काय घडलं ते
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा रंग आता चढू लागला आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात त्याची चुणूक दिसून आली आहे. तिसरा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात रंगला. लिंबूटिंब समजल्या जाणाऱ्या या संघाची कामगिरी पाहून आता दिग्गज संघांनाही घाम फुटल्याशिवाय राहाणार नाही. एखाद्या दिग्गज संघाची सुपर 8 ची वाट हे संघ कापू शकतात.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामना ओमान आणि नामिबिया यांच्यात रंगला. नाणेफेकीचा कौल नामिबियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.ओमानने 19.4 षटकात सर्व गडी गमवून 109 धावा केल्या आणि विजयासाठी 110 धावांचं आव्हान दिलं. पण सोपी धावसंख्या गाठताना नामिबियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. शेवटच्या चेंडूवर लेग बायने एक धावा आली आणि धावसंख्या बरोबरीत सुटली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. ओमानने 20 षटकात नामिबियाची विजयाची गाडी बरोबर रोखून ठेवली होती. पण सुपर ओव्हरमध्ये विजय नामिबियाच्या पारड्यात झुकला. फलंदाजी आलेल्या नामिबियाच्या विजने पहिल्या दोन चेंडूवरच 10 धावा ठोकल्या आणि संघाला सहा चेंडूत मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने 21 धावांचं आव्हान ओमानसमोर ठेवलं. पण ओमानचा संघ 1 गडी गमवून 10 धावा करू शकला आणि नामिबियाने 10 धावांनी विजय मिळवला.
ओमानने सुपर ओव्हर टाकण्यासाठी बिलाल खानची निवड केली. नामिबियाकडून समोर डेविड विज होता. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर एक धाव घेत गेरहार्ड इरामसला स्ट्राईक दिली. त्याने शेवटच्या दोन चेंडूवर सलग दोन चौकार मारले आणि धावसंख्या बिनबाद 21 वर नेऊन ठेवली. ओमानसमोर सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 22 धावांचं आव्हान होतं.
नामिबियाने सुपर ओव्हरसाठी डेविड विजची निवड केली. पहिल्या चेंडूवर नसीम खुशीने दोन धावा घेतल्या. त्यानंतरचा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर विजने नसीम खुशीच्या दांड्या उडवल्या. त्यानंतर अकिब इलियास मैदानात उतरला. तीन चेंडूत 20 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि झीशान मकसूदला स्ट्राईक दिली. तिथपर्यंत हा सामना नामिबियाच्या पदरात पडला होता. पाचव्या चेंडूवर झीशानने एक धाव घेतली. तर सहाव्या चेंडूवर अकिबने उत्तुंग षटकार मारला. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
ओमान (प्लेइंग इलेव्हन): कश्यप प्रजापती, नसीम खुशी (विकेटकीपर), आकिब इलियास (कर्णधार), झीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, मोहम्मद नदीम, मेहरान खान, शकील अहमद, कलीमुल्लाह, बिलाल खान.
नामिबिया (प्लेइंग इलेव्हन): मायकेल व्हॅन लिंजेन, निकोलास डेव्हिन, जॅन फ्रायलिंक, गेर्हार्ड इरास्मस (कर्णधार), मालन क्रुगर, जेजे स्मित, डेव्हिड विज, झेन ग्रीन (विकेटकीपर), रुबेन ट्रम्पेलमन, बर्नार्ड स्कोल्ट्ज, टांगेनी लुंगामेनी
