PAK vs SL : श्रीलंका फायनलमध्ये, पाकिस्तानवर 6 धावांनी मात, पराभवाची परतफेड
Pakistan vs Sri Lanka Match Result : श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तान विरुद्ध 184 धावांचं यशस्वीरित्या बचाव केला. श्रीलंकेने पाकिस्तानला रोखत अंतिम फेरीत धडक दिली. सलमान आघा नाबाद राहिला. मात्र सलमान पाकिस्तानला विजयी करण्यात अपयशी ठरला.

श्रीलंका क्रिकेट टीमने टी 20i ट्राय सीरिजमध्ये साखळी फेरीतील सहाव्या आणि अंतिम सामन्यात यजमान पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. श्रीलंकेने पाकिस्तानवर 6 धावांनी मात केली. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्युत्तरात पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावांपर्यंतच मजल मारता आली. कॅप्टन सलमान आघा याने पाकिस्तानला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र आघाला यश आलं नाही. श्रीलंकेने अशाप्रकारे हा सामना आपल्या नावावर केला. श्रीलंकेने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी 29 नोव्हेंबरला फायनलमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान-श्रीलंका सामना होणार आहे.
श्रीलंकेसाठी कामिल मिशारा याने अर्धशतकी खेळी केली. तर कुसल मेंडीस याने 40 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानकडून कॅप्टन सलमान आघा याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र सलमान मोठी खेळी करुनही पाकिस्तानला विजयी करण्यात यशस्वी ठरला नाही. त्यामुळे पाकिस्तान विजयी चौकार लगावण्यापासून 6 धावांनी दूर राहिला.
श्रीलंकेची बॅटिंग
श्रीलंकेचा ओपनर पाथुम निसांका याने 8 रन्स केल्या. तर कामिल मिशारा याने 48 चेंडूत 3 सिक्स आणि 6 फोरसह 76 रन्स केल्या. कामिलच्या या खेळीला अबरार अहमद याने ब्रेक लावला. कुसल मेंडीस याने 23 बॉलमध्ये 40 रन्स केल्या. जनिथ लियानागे याने अखेरच्या क्षणी 24 बॉलमध्ये 24 रन्स केल्या. तर दासुन शनाका याने 17 धावांचं योगदान दिलं. श्रीलंकेने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 184 धावा केल्या.
पाकिस्तानचा पराभव
पाकिस्तानची काही खास सुरुवात राहिली नाही. साहिबजादा फरहान 9 धावांवर आऊट झाला. सॅम अयुब याने 27 धावा केल्या. बाबर आझम आला तसाच झिरोवर आऊट होऊन गेला. तर सलमान आघा याने अर्धशतक केलं. त्यामुळे पाकिस्तानला विजयाची आशा होती. मात्र सलमानला पाकिस्तानला विजयी करणं जमलं नाही. सलमानने 44 बॉलमध्ये 63 रन्स केल्या. तर उस्मान खान याने 23 बॉलमध्ये 33 रन्स केल्या.
श्रीलंकेने पाकिस्तानला सलग चौथ्या विजयापासून रोखलं
Sri Lanka hold their nerves to seal a hard-fought win against Pakistan 💪#PAKvSL 📝: https://t.co/UGzdZ9QTSe pic.twitter.com/x3QKiyY1tB
— ICC (@ICC) November 27, 2025
श्रीलंकेकडून पराभवाची परतफेड
दरम्यान श्रीलंकेने या विजयासह पाकिस्तानच्या पराभवाची परतफेडही केली. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका याआधी 22 नोव्हेंबरला आमनेसामने आले होते. तेव्हा पाकिस्तानने श्रीलंकेवर मात केली होती. त्यानंतर आता श्रीलंकेने या पराभवाची अचूक परतफेड केली.
