AUS vs ENG: मालिका विजयाच्या उंबरठ्यावर कांगारूंनी कर्णधार बदलला, तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा

Ashes 2025-2026 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकून 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकताच मालिका खिशात घातली जाणार आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाने संघाचा कर्णधार बदलला आहे.

AUS vs ENG: मालिका विजयाच्या उंबरठ्यावर कांगारूंनी कर्णधार बदलला, तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा
AUS vs ENG: मालिका विजयाच्या उंबरठ्यावर कांगारूंनी कर्णधार बदलला, तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 10, 2025 | 3:43 PM

एशेज मालिका 2025-2026 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर वरचढ ठरला आहे. आता मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या हातात 3 संधी आहे. तर इंग्लंडसाठी करो या मरोची लढाई आहे. कारण आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व स्टीव्हन स्मिथने केलं होतं. पण तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार पॅट कमिन्सचं कमबॅक झालं आहे. दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना पॅट कमिन्स मुकला होता. त्यामुळे एडिलेड येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स हा नेतृत्व करताना दिसणार आहे. 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या सामन्यासाठी पॅट कमिन्स वगळता कोणताही बदल केलेला नाही.

पॅट कमिन्स पुनरागमनानंतर प्रशिक्षक अँड्र्यूज मॅक्डॉनल्ड यांनी सांगितलं की, संघासाठी कर्णधाराला पुन्हा एकदा एक्शन मोडमध्ये पाहण्यास उत्सुक आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर पॅट कमिन्ससमोर विजयी मालिका कायम ठेवण्याचं आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना 8 विकेट्सने आणि दुसरा कसोटी सामनाही 8 विकेटने जिंकला होता. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया इंग्लंडविरुद्ध एडिलेडमध्ये 10वा कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी खेळलेल्या नऊ पैकी पाच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. दोन सामने गमावले आणि दोन सामने अनिर्णित ठरले आहेत. दुसरीकडे, स्टिव्हन स्मिथ आता उर्वरित सामन्यात एक फलंदाज म्हणून उतरणार आहे.

दुखापतीमुळे ब्रिस्बेन कसोटीला मुकलेला उस्मान ख्वाजालाही संघात कायम ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला टाचेच्या आणि मांडीच्या दुखापतींमुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अ‍ॅलेक्स केरी, ब्रँडन डॅगेट, कॅमरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, जेक वेदरॉल्ड, ब्यू वेबस्टर.