World Cup 2023 : आशिया कपमध्ये जे घडलं तेच वर्ल्डकपमध्ये घडणार?; दोन दिवसात 3 सामने रद्द झाल्याने धाकधूक वाढली
येत्या 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक सामने सुरू होत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला सामना होणार आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान हा सामना होत आहे. तर येत्या 8 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाची भिडत ऑस्ट्रेलिया विरोधात होणार आहे.

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : वर्ल्ड कप 2023 साठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. जे संघ वर्ल्डकपचे दावेदार मानले जातात त्यात भारतीय टीमही आहे. सध्या वॉर्म अप मॅच सुरू आहे. त्यानंतर वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. अवघ्या चार दिवसानंतर म्हणजे 5 ऑक्टोबरपासून विश्वचषक सामना सुरू होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सर्वांच्याच मनात एक भीती निर्माण झाली आहे. जे आशिया कपमध्ये झालं तेच वर्ल्ड कपमध्ये तर होणार नाही ना? अशी शंकेची पाल सर्वांच्या मनात चुकचूकली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या सामन्यांचा आनंद घेता येणार की नाही? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
ही धडकी भरण्यामागचं कारण म्हणजे हवामान. पाऊस. सध्या वर्ल्ड कपची वॉर्म अप मॅच सुरू आहे. पण या मॅचवर पावसाने विरजन टाकलं आहे. या वॉर्म अप मॅचला सुरू होऊन अवघे दोन दिवस झाले आहेत. अन् या दोन दिवसात तीन सामने केवळ पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण विश्वचषकाचा हा ट्रेलर तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. आशिया कप सामन्यातही पावसाने खो घातला होता. तेच तर आता वर्ल्ड कपमध्ये तर होणार नाही ना? अशी भीती क्रिकेटप्रेमींना वाटत आहे.
तीन सामने रद्द
वॉर्म अप सामन्यात पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान दरम्यानचा सामना रद्द झाला होता. आता भारत आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया-नेदरलँड्स दरम्यान सामना होऊ शकला नाही. त्यामुळे हेच संपूर्ण विश्वचषक सामन्यात झालं तर काय होईल? असा सवाल क्रिकेटप्रेमींच्या मनात निर्माण झाला आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं होतं. तेव्हाच पावसामुळे या सामन्यांमध्ये व्यत्यय येऊ शकतो, असं प्रत्येकाला वाटत होतं.
पाऊस खेळ खराब करणार?
भारतात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होतो. कधी कधी पावसाळा लांबतो. यंदाही पाऊस सुरूच आहे. पाऊस लांबण्याची शक्यताही आहे. भारताच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचा परिणाम वर्ल्ड कपवरही होणार असल्याचं दिसत आहे. गुवाहाटीत भारताचा सामना झाला नाही. तर तिरुवनंतपुरमध्ये आतापर्यंत दोन वॉर्म अप मॅच रद्द करण्यात आले आहेत. याआधी भारत- ऑस्ट्रेलिया सीरीजवेळी पावसाने गोंधळ घातला होता. भारतातील हवामान पाहता आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे.
पुढे काय?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान देशात पाऊस कमी होईल. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाळा संपलेला असला तरी काही सामने वगळता इतर ठिकाणी पावसाचा फारसा परिणाम होणार नाही ही आजची स्थिती आहे. हवामान कधी बदलेल, कधी काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होईल आणि कधी अवकाश निरभ्र होईल हे आताच सांगता येत नाही. हवामान खात्याचे अंदाज तंतोतंत खरेही ठरू शकतात किंवा फोलही ठरू शकतात. त्यामुळे पुढील काळातच विश्वचषकातील सामन्यांचं काय होणार हे स्पष्ट होणार आहे.
