SA vs BAN: केशव महाराज मॅचविनर, दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड रेकॉर्ड, बांगलादेशवर 4 धावांनी थरारक विजय
South Africa vs Bangladesh Highlights In Marathi: दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं होतं.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 21 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर थरारक विजय मिळवला आहे. केशव महाराजने शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांचा बचाव करत दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशने झुंज देत सामना 20 व्या ओव्हरपर्यंत आणला. बांगलादेशला विजयासाठी 11 धावांची गरज होती. तेव्हा केशव महाराजने शेवटची ओव्हर टाकली. तर मैदानात अनुभवी महमदुल्लाह आणि त्याच्यासोबत जाकेर अली होता. केशवने वाईडसह सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेवरही दबाव होताच. मात्र केशव महाराजने हुशारीने बॉलिंग केली. महमदुल्लाहने पहिल्या बॉलवर एक धाव घेतली. त्यानंतर जाकेर अलीने दुसऱ्या बॉलवर 2 धावा घेतल्या. तिसऱ्या बॉलवर जाकेर अलीने फटका मारला, मात्र कॅप्टन एडन मारक्रमने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. त्यानंतर रिशाद हौसेन मैदानात आला. रिशादने सिंगल रन घेत महमदुल्लाह याला स्ट्राईक दिली.
आता बांगलादेशला विजयासाठी 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. महमदुल्लाहने केशव महाराजने टाकलेला बॉल फटकावला. बांगलादेशनेने सामना जिंकलाच होता, मात्र बाऊंड्री लाईनवर एडन मारक्रमने कॅच पकडला आणि इथेच दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला. त्यामुळे आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज होती. केशवने चलाखीने कोणतीही चूक न करता बॉल टाकला. तास्किन अहमदने 1 धाव घेतली. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 4 धावांनी विजय मिळवला. केशवने शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या 4 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह विजयाची हॅट्रिक पूर्ण केली.
बांगलादेशकडून तॉहिद हृदॉय याने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. महमदुल्लाह याने 20 धावांचं योगदान देत बांगलादेशला सामन्यात कायम ठेवण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्याला मॅचविनर होण्याची संधी होती, मात्र एडन मारक्रमने कॅच घेतली आणि विषय संपवला. कॅप्टन नजमूल हुसैन शांतो याने 14 धावा जोडल्या. तर इतरांना काही खास करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी केशव महाराज याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडा आणि एनरिख नॉर्खिया या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या.
ऐतिहासिक कामगिरी
🇿🇦 win a thriller in New York 🔥
A skilful bowling display against Bangladesh helps them defend the lowest total in Men’s #T20WorldCup history 👏#T20WorldCup | #SAvBAN | 📝: https://t.co/XCZhIYVOHi pic.twitter.com/Kak9T5Jq0S
— ICC (@ICC) June 10, 2024
दक्षिण आफ्रिकेने या विजयासह नवा इतिहास रचला. दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करणारी टीम ठरली. याआधी हा विश्व विक्रम श्रीलंकेच्या नावावर होती. लंकेने न्यूझीलंड विरुद्ध 2014 साली 119 धावांचा बचाव केला होता.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या जोडीने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 79 धावांच्या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 113 धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या दोघांनी अनुक्रमे सर्वाधिक 46 आणि 29 धावा केल्या. तर इतरांनी बांगलादेशी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. बांगलादेशकडून तांझिम हसन साकिबने तिघांना आऊट केलं. तास्किन अहमदने 2 विकेट्स घेतल्या. तर रिशाद हौसेनने 1 विकेट घेतली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हौसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, जाकेर अली, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मारक्रम (कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.