Video : सचिन तेंडुलकरने धुळवड साजरी, युवराज सिंगला सळो की पळो करून सोडलं
देशभरात मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी करण्यात आली. या सणाचा आनंद लुटताना क्रिकेटपटू मागे नव्हते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने युवराज सिंग, अंबाती रायडू आणि युसूफ पठाणसह होळी साजरी केली. युवराज सिंगला यावेळी सळो की पळो करून सोडलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मास्टर्स लीग स्पर्धेत फलंदाजीचे रंग उधळत आहे. मैदानात पुन्हा एकदा एकापेक्षा एक सरस खेळी करत आहे. दुसरीकडे, मैदानाबाहेरही मास्टर ब्लास्टर चर्चेत आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या सहकाऱ्यांसोबत होळीचा आनंद लुटला. सचिन तेंडुलकरने होळीचे रंग भरताना सिक्सर किंग युवराज सिंगला सळो की पळो करून सोडलं. युवराज सिंगला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. ही होळी युवराज सिंगला कायम स्मरणात राहिल हे मात्र नक्की.. सचिन तेंडुलकरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिन तेंडुलकर युवराज सिंगवर पाणी टाकताना दिसत आहे. युवराज सिंग हॉटेलच्या रुममध्ये झोपला होता. तेव्हा मास्टर्स ब्लास्टर सचिन तेंडुलकरने प्लान आखला. तो तसा काही बाहेर येणार नाही याची कल्पना होती.
सचिन तेंडुलकर आपला प्लान त्या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. “वॉटरगन भरली आहे, मी युवराज सिंगच्या खोलीत जात आहे, तो झोपला आहे. त्याने काल रात्री खूप षटकार मारले.” त्यानंतर, एका टीममेटने दाराबाहेरून ‘हाऊसकीपिंग’ असा आवाज दिला आणि युवराजने दार उघडताच त्याच्यावर रंगांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर अंबाती रायुडूसोबतही असेच काहीसे घडले आणि तोही तसाच जाळ्यात अडकला. त्यालाही सचिनने टीममेट्ससह रंगवले. सचिनसोबत युसूफ पठाण यानेही होळीचा सण साजरा केला. सर्व खेळाडू सध्या इंडियन मास्टर्स लीग स्पर्धेत खेळत आहे.
Holi fun with my @imlt20official teammates, from blue jerseys to colourful moments, this is how we say, “Happy Holi!” 💙 pic.twitter.com/uhYBZvptVT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 14, 2025
इंडिया मास्टर्स संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा 94 धावांनी पराभव करून संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. इंडिया मास्टर्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. कर्णधार सचिनच्या 42 धावा आणि युवराज सिंगच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर संघाने 220 धावांचा मोठा आकडा गाठला.