
Sachin Tendulkar on Virat Kohli: बीसीसीआयचं उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारतीय क्रिकेटसंबंधित एक खास किस्सा शेअर केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी अगोदरच विश्वास व्यक्त केला होता की एक दिवस त्याचा विक्रम विराट कोहली तोडणार. सचिन हा निवृत्तीच्या वाटेवर असताना आणि विराट कोहलीचे करिअर सुरू होतानाच्या या किस्स्याची आठवण राजीव शुक्ला यांना आता झाली. त्यांनी सचिनची दूरदृष्टी वाखाणली आणि त्याचे कौतुकही केले.
विराट तोडणार विक्रम
राजीव शुक्ला म्हणाले की सचिन तेंडुलकर याने त्याच्या निवृत्तीच्या काळात अनेक भाष्य केले. या काळात सचिनसोबत बराच वेळ चर्चा झाली. त्यावेळी अनेकांना वाटत होते की सचिन याने लागलीच निवृत्तीची घोषणा करू नये. त्याने कमीत कमी अजून एक वर्ष तरी खेळावे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची 25 वर्षे पूर्ण झाली असती. राजीव शुक्ला यांनी पण सचिनला एक वर्ष खेळण्याचा आग्रह धरला होता. पण याविषयी सचिनचे मत अगदी वेगळे होते असे शुक्ला यांनी सांगितले.
सचिनचा महान विचार
सचिन याने त्यावेळी मोठा विचार बोलून दाखवला. क्रिकेटविषयीचे त्याचे प्रेम त्यातून दिसते. जोपर्यंत आपण क्रिकेटला 100 टक्के देऊ शकतो. मैदानात चमकदार कामगिरी करू शकतो, तोपर्यंत आपण क्रिकेट खेळावं, असं त्याचे म्हणणे होते. ज्यादिवशी त्याचं शरीर पूर्णपणे साथ देणार नाही, त्यादिवशी तो क्रिकेटला रामराम करणार. त्यानंतर काही दिवसांनीच मास्टर ब्लास्टरने क्रिकेट निवृत्तीची घोषणा केली. नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिज संघाविरोधातील कसोटी मालिकेत सचिन तेंडुलकर याने त्याच्या करिअरचा अखेरचा सामना खेळला. हा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये खेळण्यात आला होता. त्यावेळी सचिनसोबत त्याचे चाहते आणि सहकारी खेळाडू सुद्धा भावुक झाले होते.
विराटमध्ये ते गुण
एक दिवस सचिन तेंडुलकरच्या घरी राजीव शुक्ला हे जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांनी सचिनला तुझे रेकॉर्ड तुटेल की नाही असा सवाल केला. तेव्हा रेकॉर्ड हे तयार होण्यासाठीच असतात, असे वक्तव्य त्याने केले. तर तुझा रेकॉर्ड कोणता खेळाडू तोडेल असे तुला वाटतं , असे सचिनला विचारल्यावर त्याने पटकन विराट कोहलीचे नाव घेतले. विराट कोहली हा मेहनती, कष्टाळू, शिस्त असलेला आणि सतत स्वतःला नव्या उंचीवर घेऊन जाणारा खेळाडू असल्याचे कौतुकही सचिनने त्यावेळी केले होते. आज विराट कोहलीने सचिन तेंडुलकर याचे काही विक्रम मोडले आहे. सचिनने बऱ्याच वर्षाअगोदर केलेले हे भाकीत आता खरं ठरल्याचे राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं.