Virat Kohli-Rohit Sharma : विराट-रोहितला एक न्याय आणि इतरांना….एका मोठ्या क्रिकेटरचा BCCI ला थेट सवाल
Virat Kohli-Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मा ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावं आहेत. त्यांना बीसीसीआयकडून जी वागणूक मिळते, त्यावर आता एक मोठ्या भारतीय क्रिकेटपटूने सवाल उपस्थित केलाय. या क्रिकेटरने परखडपणे आपली मत मांडली आहेत.

कानपूर कसोटीआधी संजय मांजरेकर काही गोष्टी बोलले. त्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. विराट-रोहितवरुन संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयवर काही आरोप केले. “विराट-रोहितला दुसऱ्या खेळाडूंच्या तुलनेत जास्त प्राधान्य मिळतं, हे अजिबात चांगलं लक्षण नाहीय” असं संजय मांजरेकर म्हणाले. “भारतीय टीममध्ये काही स्टार खेळाडूंना त्यांच्या इमेजनुसार ‘स्पेशल ट्रीटमेंट’ दिली जाते. हे फार आधीपासून सुरु आहे” असं मांजरेकर म्हणाले.
“विराट-रोहित दुलीप ट्रॉफीमध्ये खेळले नाहीत. हे भारतीय क्रिकेटसाठी आणि त्या दोघांसाठी सुद्धा चांगलं नाहीय. रोहित-विराट जर देशांतर्गत टेस्ट सामने खेळले असते, तर गोष्टी थोड्या वेगळ्या झाल्या असत्या” असं संजय मांजरेकर क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले. चेन्नई टेस्टमध्ये रोहित-विराटच्या खराब प्रदर्शनाच्या आधारावर मांजरेकर असं म्हणाले.
बुमराहबद्दल काय बोलले?
“दोन्ही खेळाडूंच्या क्षमतेबद्दल कुठलीही शंका नाही ते नक्कीच बाऊन्स बॅक करतील” असा विश्वासही मांजरेकरांनी व्यक्त केला. भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सुद्धा T20 वर्ल्ड कप नंतर आराम देण्यात आला होता. त्याला सुद्धा दुलीप ट्रॉफीमध्ये न खेळण्याची परवानगी मिळाली. पण मांजरेकर त्याच्याबद्दल काही बोलले नाहीत.
वेगवेगळी वागणूक
दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू खेळले. यात केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंतसारखी मोठी नावं आहेत. टीमचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना न खेळण्याची परवानगी दिली होती. यावर संजय मांजरेकर यांनी परखडपणे आपलं मत मांडलं. संजय मांजरेकर यांनी या मुद्दावरुन बीसीसीआयवर निशाणा साधला. ‘खेळाडूंची इमेज आणि प्रतिष्ठा पाहून त्यांना वेगवेगळी वागणूक मिळते’ असं मांजरेकर म्हणाले.
‘ही खूप जुनी समस्या’
भारतीय क्रिकेटसाठी जे चांगलं आहे, त्या दृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत असं सल्ला मांजरेकरांनी बीसीसीआयला दिला. “भारतीय क्रिकेटमध्ये काही खेळाडूंना त्यांच्या प्रतिष्ठेनुसार खास सुविधा मिळतात. ही खूप जुनी समस्या आहे” असं मांजरेकर म्हणाले. त्यामुळे त्या खेळाडूंचच नुकसान होतं, असं ते म्हणाले.
रोहित-विराट किती महिन्यांपूर्वी शेवटचा कसोटी सामना खेळलेले?
विराट कोहली आणि रोहित शर्मा बराच काळ कसोटी क्रिकेटपासून लांब होते. बांग्लादेश विरुद्ध चेन्नई कसोटीत दोघे अपयशी ठरल्यानंतर संजय मांजरेकर यांनी हे मुद्दे उपस्थित केले. विराट नऊ महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये टेस्ट मॅच खेळला होता. बांग्लादेश विरुद्ध पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. रोहित सहा महिन्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीज खेळलेला. त्याने चेन्नई कसोटीत पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 5 धावा केल्या.
