भारत-पाकिस्तान सामन्यात किती कोटींचा सट्टा? संजय राऊतांनी थेट आकडाच सांगितला, म्हणाले गुजरातमधून
आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यातील पाकिस्तानी खेळाडू साहिबझादा फरहानच्या वादग्रस्त सेलिब्रेशनवर संजय राऊत यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. फरहानने अर्धशतकानंतर बॅट बंदूकप्रमाणे वापरून फायरिंगची नक्कल केली.

सध्या आशिया कप सुरु असून काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एका पाकिस्तानी क्रिकेटरने संतापजनक कृती केली. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी साहिबझादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या. साहिबझादाने 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. यानंतर साहिबझादाने अर्धशतकाचं सेलीब्रेशन करताना बॅट बंदूकीप्रमाणे हातात धरत फायरिंग करण्याची अॅक्शन केली. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. काल पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आम्हाला खिजवलं. आमच्या शहीदांचा अपमान केला आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक गोष्टीत अडकून पडला आहे. काल मैदानातून बाहेर पडायला हवं होतं, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावर भाष्य केले. काल भारत पाकिस्तान सामना जो खेळला गेला त्यातील एक चित्र जे प्रसिद्ध झालेलं आहे. त्यात साहिबजादा फरहान नावाचा क्रिकेटपटू आहे जो फरार झालेला आहे. तो आमचा साहिबजादा आणि अमित शाहांचे शहजादा हे एकच आहे. साहिबजादाने अर्धशतक झाल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर एके४७ घेतल्याप्रमाणे बॅट घेऊन गोळ्या मारतात अशी जी अॅक्शन केली, ती कोणासाठी आणि का, असा सवाल संजय राऊतांनी केला.
जय शाहाला भारतरत्न देऊन टाका
या कृतीतून साहिबजादाने दाखवलं की अशाचप्रकारे एके४७ चा वापर करुन पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये तुमच्या २६ लोकांना ठार केलं. हे त्याने प्रतिकात्मकरित्या दाखवलं. हे जय शाहासह संपूर्ण भारतीय संघ थंडपणे पाहत होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत शेकहँड केलं नाही, तर त्याचं कौतुक करण्यात आले. मग काल हे कृत्य केल्यावर साहिबजादा फरहानच्या तिथेच कंबरड्यात लाथ घालायला हवं होतं. हे सर्व फक्त अमित शाह आणि जय शाह यांच्यामुळेच देशाला भोगावं लागत आहे. ते इतकं महान राष्ट्रकार्य करतात की जय शाहाला भारतरत्न द्यायला हवं. इतकं महान राष्ट्रभक्तीपर कार्य करत आहेत. आपण सावरकरांना दिलं नाहीत. किमान जय शाहाला तरी द्या. त्यांना भारतरत्न देऊन टाका, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
तुम्ही भारत आणि पाकिस्तान सामना खेळताय. इथे आमच्या भारतीय नागरिकांच्या रक्ताचे सडे पडतात. २६ निरपराध लोकांची हत्या झाली. त्यांच्या पत्नींच्या कपाळावरील कुंकू पुसलं गेलं. तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं. तुम्ही राष्ट्रभक्तीची मोठी भाषण केली. मत मागतात. मग पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचे नियोजन काय? कोणासाठी खेळताय? कोणाचं गॅमलिंग सुरु आहे, कुणाचा जुगार चाललय हे आम्हाला एकदा कळू द्या, असेही संजय राऊत म्हणाले.
काल मैदानातून बाहेर पडायला हवं होतं
काल पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आम्हाला खिजवलं. आमच्या शहीदांचा अपमान केला आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक गोष्टीत अडकून पडला आहे. काल मैदानातून बाहेर पडायला हवं होतं. जय शाहांना या देशाचे नागरिक म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार आहे का, तुमच्या राष्ट्रभक्तीचा हा गुजरात पॅटर्न आहे का, इतरांनी मरायचं आणि गुजरातने पैसे कमवायचेय, हे इतर कोणाच्या राज्यात घडलं असतं तर भाजप थयथयाट करत बाहेर आली असती. आता का करत नाही. साधा निषेधाचा एक सूर निघालेला नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले.
भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वात मोठा सट्टा
टीम इंडियाने पाकिस्तानसोबत खेळू नये ही मागणी देशाच्या १४० कोटी जनतेची आहे. त्यांना बॅन करायचं की नाही, हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. जय शाहाने जर हे ठरवलं तर ते करु शकतात. त्यांचे वडील जर ३७० कलम हटवू शकतात, तर ते पाकिस्तानवर बंदी आणू शकतात. भारत पाकिस्तान सामन्यावर सर्वात मोठा सट्टा हा भारतात खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात दीड लाख कोटीचा सट्टा खेळला गेला. हा सट्टा मोठ्या प्रमाणात गुजरातमधून खेळला जात आहे. त्यातील २५ हजार कोटी सरळ पाकिस्तानात जातात. कालच्या सामन्यावर मुंबई, गुजरात आणि राजस्थानमधून सट्टा खेळला गेला. कालही दीड ते दोन लाख कोटींचा सट्टा खेळला गेला. त्यातील मोठी रक्कम ही पाकिस्तानला जाते, त्याच पैशातून आमच्या निरपराध लोकांवर गोळ्या घातल्या जातात, असेही संजय राऊतांनी सांगितले.
