ENG vs IND : टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचे 5 शिल्पकार, सर्वाधिक योगदान कुणाचं?

England vs India 2nd Test : टीम इंडियाने इंग्लड विरूद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. भारताच्या या विजयात 5 खेळाडूंनी प्रमुख भूमिका बजावली. जाणून घ्या ते कोण आहेत.

ENG vs IND : टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचे 5 शिल्पकार, सर्वाधिक योगदान कुणाचं?
Indian Cricket Team
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 07, 2025 | 1:00 AM

कोणताही एकटा खेळाडू संघाला विजयी करु शकत नाही. क्रिकेट सामना जिंकण्यासाठी संघाच्या विजयात 11 खेळाडूंचं योगदान असावं लागतं. मात्र प्रत्येक सामन्याचे नायक वेगवेगळे असतात. भारताने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी जबरदस्त विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. या सामन्याचा हिरो कर्णधार शुबमन गिल ठरला. शुबमनने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. शुबमनने पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱ्या डावात शतक केलं. मात्र शुबमन व्यतिरिक्त या विजयाचे आणखी 4 शिल्पकार आहेत. या 4 खेळाडूंनीही विजयात निर्णायक भूमिका बजावली. ते कोण आहेत आणि त्यांनी या सामन्यात काय काय योगदान दिलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

कर्णधार शुबमन व्यतिरिक्त, उपकर्णधार ऋषभ पंत, अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या चौघांनी भारताला विजयी करण्यात मोलाचं योगदान दिलं. शुबमनने नेतृत्वासह बॅटिंगने चमक दाखवली. ऋषभने फटकेबाजी करण्यासह स्टंपमागून निर्णायक भूमिका बजावली. रवींद्र जडेजाने बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान दिलं. तर आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या दोघांनी एकूण 20 पैकी 17 विेकेट्स घेतल्या.

शुबमन गिल

शुबमनने या सामन्यातील पहिल्या डावात द्विशतक तर दुसऱ्या डावात शतक ठोकलं. शुबमनने एकूण 430 धावा केल्या. शुबमनने पहिल्या डावात 269 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 161 धावांची खेळी केली. शुबमन यासह दोन्ही डावात शतक-द्विशतक करणारा एकूण नववा तर दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

ऋषभ पंत

पंतने या सामन्यात एकूण 90 धावा केल्या. पंतने पहिल्या डावात 25 तर दुसऱ्या डावात 65 धावांची खेळी केली. तसेच पंतने विकेटकीपर म्हणून 2 कॅचेस घेतल्या.

रवींद्र जडेजा

ऑलराउंडरने दोन्ही डावात अर्धशतक करण्यासह 1 विकेटही घेतली. जडेजाने पहिल्या डावात 89 धावा केल्या. तर दुसर्‍या डावात जड्डूने नाबाद 69 धावांचं योगदान दिलं. जडेजाने दुसऱ्या डावात 1 विकेट मिळवली.

आकाश दीप

आकाश दीप याने या सामन्यात एकूण 10 विकेट्स मिळवल्या. आकाशने पहिल्या डावात 4 तर दुसर्‍या डावात 6 विकेट्स मिळवल्या. आकाशने एकाच सामन्यात पंजा उघडण्यासह 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज याने दुसऱ्या कसोटीत एकूण 7 विकेट्स मिळवल्या. सिराजने पहिल्या डावात 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सिराजची यासह एका डावात इंग्लंडमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची पहिली वेळ ठरली. त्यानंतर सिराजने दुसऱ्या डावात 1 विकेट मिळवली.