लाईव्ह सामन्यात घुसला साप, श्रीलंका-बांगलादेश पहिला एकदिवसीय सामन्यात गोंधळ
कसोटी मालिकेनंतर श्रीलंका आणि बांग्लादेश या संघात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला 77 धावांनी पराभूत केलं. तसेच मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पण या सामन्यात एक साप घुसल्याने एकच खळबळ उडाली.

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला वनडे सामना कोलंबोत पार पडला. प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 49.2 षटकात सर्व गडी गमवून 244 धावा केल्या आणि विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं. चरीथ असलंकाने या सामन्यात 106 धावांची खेळी केली. त्यामुळे 244 धावांपर्यंत मजल मारता आली. पण बांगलादेशचा संपूर्ण संघ 35.5 षटकात 167 धावा करून तंबूत परतला. श्रीलंकेने हा सामना 77 धावांनी जिंकला. श्रीलंकेकडून वनिंदु हसरंगाने 4, तर कामिंदु मेंडिसने 3 विकेट घेतल्या. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. बांग्लादेशचा संघ फलंदाजी करत होता आणि तिसरं षटक सुरु होतं. तेव्हाच सापाने मैदानात एन्ट्री मारली. त्यामुळे मैदानात एकच खळबळ उडाली. काही काळ हा सामना थांबवावा लागला होता. सोशल मीडियावर आता प्रसंगाची चर्चा होत आहे आणि नेटकरी ‘डर्बी नागिन’ म्हणून ट्रोल करत आहेत.
श्रीलंकेकडून तिसरं षटक टाकण्यासाठी असिथा फर्नांडो आला होता. या षटकातील तिसरा चेंडू टाकत असताना मैदानात साप बघून खेळाडू घाबरले. यामुळे काही काळ सामना थांबवण्याची वेळ आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सापाला मैदानाबाहेर काढलं. मागच्या वर्षी देखील साप मैदानात घुसल्याची घटना घडली होती. मागच्या वर्षी प्रेमदासा स्टेडियममध्ये श्रीलंका प्रीमियर लीग सुरु असताना काही सामन्यात साप घुसल्याचे प्रकार घडले होते. तेव्हाही हा सामना काही काळ थांबवला होता. कोलंबोच्या या मैदानात साप घुसणं आता एक प्रथा पडली आहे.
Snake in Ground During Sri Lanka Bangladesh 1st ODI in Colombo. pic.twitter.com/McmYPRHnp3
— Sohail Imran (@sohailimrangeo) July 2, 2025
श्रीलंका बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉल मैदानात पार पडला होता. यावेळी एक गारुडी दोन नाग आणि एका माकडाला घेऊन मैदानात सामना पाहण्यासाठी आला होता. पुंगी वाजवत तो त्या सापांना नियंत्रणात करत होता. तसेच सामन्याचा पुरेपूर आनंद लुटत होता. हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
A Snake Charmer in Galle watching Sri Lanka Vs Bangladesh with Snakes and Monkey. pic.twitter.com/bcXmA6caUh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 21, 2025
श्रीलंकेने पहिला वनडे सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता उर्वरित दोन सामन्यात कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. दुसरा वनडे सामना 5 जुलै रोजी, तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना 8 जुलैला होणार आहे.
