SL vs BAN : कसोटीच्या पहिल्याच दिवशी बांगलादेश श्रीलंकेवर पडला भारी, दिवसअखेर असा फिरला सामना
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 पर्वातील पहिला कसोटी सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. सुरुवातीला तीन धक्के बसल्यानंतर बांगलादेशने डाव सावरला.

श्रीलंका आणि बांगलादेश या दोन क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षात द्वंद्व पाहायला मिळालं आहे. बांगलादेश संघ श्रीलंकेसाठी कायम डोकेदुखी ठरला आहे. त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात या मालिकेपासून झाली आहे. पहिला कसोटी सामना श्रीलंकेतील गॅले येथे सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी निवडली. बांगलादेशची सुरुवात एकदम ढिसाळ झाली. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. अवघ्या 45 धावांवर तीन खेळाडू तंबूत होते. त्यामुळे बांग्लादेश संघावर दडपण वाढलं होतं. पण त्यानंतर बांगलादेश संघ श्रीलंकेवर भारी पडला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 90 षटकं खेळत बांगलादेशने 3 गडी गमवून 292 धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या दिवसावर बांगलादेशने मजबूत पकड मिळवली असं म्हणायला हरकत नाही. कर्णधार नजमुल होस्सेन शांतोन 260 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 136 धावा केल्या आहेत. तर मुश्तफिकुर रहिमने 186 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारत नाबाद 105 धावा केल्या आहेत.
बांगलादेशला पहिला धक्का अनामुल हकच्या रुपाने बसला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर शदमन इस्लाम 14 धावांवर असताना तंबूत बाद झाला. त्यानंतर मोनिमुल हकने 29 धावांची खेळी केली. मात्र त्याला आपली खेळी पुढे नेता आली नाही. थरिन्दू रत्ननायकेच्या गोलंदाजीवर बाद झाला. आतापर्यंत बाद झालेल्या तीन विकेटपैकी दोन विकेट या थरिन्दूच्या नावावर आहेत. तर एक विकेट असिथा फर्नांडोने घेतली आहे. तीन विकेट पडल्यानंतर कर्णधार नजमुल शांतो आणि मुस्तफिकुर रहिम यांनी डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी या दोघांनी नाबाद 247 धावांची भागीदारी केली. या दोघांनी शतकं पूर्ण केली. त्यामुळे दुसर्या दिवशीही बांगलादेशचा वरचष्मा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून प्रत्येक कसोटी सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी राखायची तर सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. आता दुसऱ्या दिवशी श्रीलंकन गोलंदाज कसं कमबॅक करतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. जर बांग्लादेशने पहिल्या डावात 450 पार धावा केल्या तर श्रीलंकेचं विजयाचं गणित बिघडू शकते. यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा आहे. त्यात ही खेळपट्टी फलंदाजीला मदत करणारी असल्याने विकेट घेणं आव्हानात्मक असणार आहे.
