Video : क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट डीआरएस रिव्ह्यू, बांगलादेशची अपील पाहून तुम्हालाही येईल हसू
श्रीलंका बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना सुरु असून पहिल्याच दिवशी बांगलादेशचं हसं झालं. बांगलादेशने घेतलेला रिव्ह्यू पाहून सोशल मीडियावर जोरदार हास्यजत्रा रंगली आहे. नेटकरी आपआपल्या पद्धतीने बांगलादेशची फिरकी घेत आहेत.

बांगलादेश श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने 328 धावांनी जिंकला. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून पहिला दिवसाचा खेळ संपला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 4 गडी बाद 314 धावा केल्या आहेत. असं सर्व चित्र असताना बांगलादेशने घेतलेल्या डीआरएस रिव्ह्यूची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. लहानगं पोरंही रिव्ह्यू घेताना विचार करतं. पण बांगलादेशने घेतलेला रिव्ह्यू पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. बांगलादेशचा कर्णधार नजमुल होसैन शांतो याने घेतलेला रिव्ह्यू पाहून समालोचकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हा संपूर्ण प्रकार 44 व्या षटकात झाला. कुसल मेंडिस खेळत होता आणि समोर तैजुल इस्लाम गोलंदाजी करत होता. यावेळी मेंडिसने त्याने टाकलेला बॉल डिफेंड केला. पण नजमुल शांतोला इतकं स्पष्ट असूनही दिसलं नाही. त्याने क्षणाचाही विलंब न करता रिव्ह्यू घेतला.
रिव्ह्यू पाहताना स्पष्ट दिसलं की बॉल बॅटच्या बरोबर मध्यभागी लागला होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही विलंब न करता नॉट आऊट दिलं. पण या रिव्ह्यूचं सर्वत्र हसं होत आहे. सोशल मीडियावर तर क्रीडाप्रेमी बांगलादेशची फिरकी घेत आहे. एकतर दोनच रिव्ह्यू असतात आणि त्यातही अशाप्रकारे वाया घालवणं म्हणजे दिव्यच म्हणावं लागेल. एका युजर्सने कमेंट्समध्ये लिहिलं आहे की, हा या दशकातील मोठा डीआरएस रिव्ह्यू आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, मी घरूनच सांगितलं असतं डीआरएस घेण्याची गरज नाही.
What just happened? 👀..#BANvSL #FanCode #CricketTwitter pic.twitter.com/sJBR5jMSov
— FanCode (@FanCode) March 30, 2024
बांगलादेशने असा रिव्ह्यू घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2016 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात असाच रिव्ह्यू घेतला होता. विराट कोहली खेळत होता आणि तैजुल इस्लाम गोलंदाजी करत होता. पण बांगलादेशच्या खेळाडूंनी गरज नसताना अपील केली. मुशफिकुर रहिमने तात्काळ रिव्ह्यू घेतला. रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू विराट कोहलीच्या बॅटला अगदी मधोमध लागला होता. त्यामुळे रिव्ह्यू वाया गेला होता. असाच कित्ता पुन्हा एकदा बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गिरवला आहे. दरम्यान, श्रीलंकेचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 4 गडी बाद 314 धावा केल्या होत्या. दिनेश चंडिमल नाबाद 34 आणि धनंजय डिसिल्वा नाबाद 15 धावांवर खेळत होता.
