हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना थेट खेळपट्टीवर पोहोचले पोलीस, पण एका कृतीने जिंकलं मन Video
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेत मुंबई विरुद्ध पंजाब सामना पार पडला. या सामन्यात हार्दिक पांड्याचा झंझावात पाहायला मिळाला. त्याच्या आक्रमक खेळीमुळे बडोद्याने पंजाबवर सहज विजय मिळवला. पण या सामन्यात एक आश्चर्यकारक घटना घडली.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाब आणि बडोदा हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाबने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. अभिषेक शर्माने आक्रमक खेळी करत 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं. तसेच बडोद्यासमोर विजयासाठी 222 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं. खरं तर या सामन्यात हार्दिक पांड्याने सर्वात महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकात 52 धावा देत 1 गडी बाद केला. पण याची वसुली हार्दिक पांड्याने दुसऱ्या डावात केली. त्याने 42 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 77 धावांची खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान एक विचित्र प्रकार घडला. हार्दिकच्या चाहत्याने त्याची खेळी सुरु असताना थेट मैदानात धाव घेतली. पांड्या फलंदाजी करत असलेल्या ठिकाणी सुरक्षारक्षकांना चुकवून पोहोचला. त्याला हार्दिक पांड्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनाही खेळपट्टीपर्यत धाव घ्यावी लागली.
सेल्फी घेण्यापूर्वीच हार्दिकच्या चाहत्याला पोलिसांनी पकडलं आणि ते त्याला बाहेर घेऊन जात होते. तेव्हा चाहता वारंवार सेल्फीसाठी विनवणी करत होता. हार्दिक पांड्याने त्याच्या चाहत्याला थांबवलं. त्याच्या जवळ गेला आणि सेल्फी घेण्यास सांगितलं. हार्दिक पांड्याचा हा अंदाज पाहून मैदानातील चाहतेही खूश झाले. त्यांनी त्याच्या कृतीचं जल्लोष करत स्वागत केलं. मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. हार्दिक पांड्याच्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी त्याच्या व्हिडीओला लाईक केलं आहे.
Play stopped multiple times in Hyderabad as fans kept running onto the ground to meet Hardik Pandya!#SyedMushtaqAliTrophy #BarodavsPunjab pic.twitter.com/klHmekLhHz
— Mohsin Kamal (@64MohsinKamal) December 2, 2025
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना बडोद्याविरुद्ध 20 षटकात 8 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावा दिल्या. बडोद्याने हे आव्हान 19.1 षटकात पूर्ण केलं. या सामन्यातील विजयात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी हार्दिक पांड्याची खेळी भारतीय क्रीडाप्रेमींसाठी दिलासादायक ठरली. बीसीसीआयच्या सीओईने नुकतंच त्याला गोलंदाजी करण्याची परवानगीही दिली आहे. पण त्याला हवी तशी लय काय सापडली नाही.
